खऱ्या सोनाराला जसा दागिना बघताच तो खरा आहे की खोटा हे कळतं, तसंच सराईत चोराला सोनं खरं आहे की खोटं हे लगेच कळू शकतं. त्यावरच त्याच्या सगळ्या चोऱ्या यशस्वी ठरत असतात. पण, बोरिवलीत एका चोराचं नशीब मात्र फुटकं निघालं. त्याने चोरलेल्या तब्बल दोन लाखांच्या बांगड्या खोट्या असल्याचं वाटून त्याने त्या चक्क फेकून दिल्या!
हा प्रकार घडला बोरिवलीमध्ये. गेल्या महिन्यात १५ नोव्हेंबरला ५९ वर्षीय अरूण गर्ग बोरिवलीहून झाशीला निघाले होते. त्यांच्या पर्समध्ये ७ लाख रूपयांचे दागिने होते. त्यांची पर्स एका चोरट्यानं मारली. तसाच प्रकार २१ नोव्हेंबरला ५४ वर्षीय प्रकाश केडिया यांच्यासोबत घडला. ते जयपूरला जात असताना त्यांच्या सामानातून ३ लाख ४० हजार रूपयांचे दागिने असलेली पर्स एका चोरट्याने लंपास केली.
या दोन्ही गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या बोरिवलीच्या जीआरपीने श्रीकांत दामानी या ४७ वर्षीय इसमाला अटक केली. मात्र, श्रीकांतकडून त्यांना फक्त ८ लाख ४० हजार रूपयांचा ऐवज मिळाला. त्यामध्ये अजून २ लाखांच्या बांगड्या असल्याची माहिती जीआरपीकडे होती.
जीआरपीने जेव्हा या बांगड्यांबद्दल श्रीकांतला विचारणा केली, तेव्हा या बांगड्या आपण फेकून दिल्याचं श्रीकांतने सांगितलं. सुरुवातीला श्रीकांत खोटं बोलत असल्याचंच जीआरपीला वाटलं. पण आपण खरं बोलत असून बांगड्या खोट्या वाटल्या म्हणून बोरिवलीच्या कोरा केंद्राजवळ आपण त्या फेकल्याचं जेव्हा श्रीकांतने सांगितलं, तेव्हा मात्र पोलिसांना हसावं की रडावं असाच प्रश्न पडला!
या बांगड्या शोधायला जेव्हा जीआरपी त्या ठिकाणी पोहोचलं, तेव्हा त्यांना तिथे बांगड्या सापडल्या नाहीत. दरम्यान, "श्रीकांत दामानी हा अतिशय सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मुंबईतील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत १० आणि लोहमार्ग पोलिसांकडे ४ असे एकूण १४ गुन्हे नोंद असल्याची", माहिती पश्चिम रेल्वे जीआरपीचे डीसीपी पुरषोत्तम कराड यांनी दिलीये.
हेही वाचा