कल्याणमध्ये जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वाकळण गावात घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. शिवराम रामा पाटील, दीपिका पाटील आणि मुलगी अनुष्का पाटील असे आत्महत्या केलेल्या तिघांचे नावं आहे.
हेही वाचाः- ‘जीएसटी’सहीत पक्के बिल दाखवा आणि एक कोटी जिंका
मुंबईच्या लगतच्या शहरांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू झाले आहेत. त्यामुळे तेथील जमिनींना सोन्याचे भाव मिळू लागले आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी त्याची जमीन मोठ्या किंमतीत विकासकाला विकू लागले आहेत. त्यातून दोन कुटुंबियांमध्ये वाद तर होणारच, वाकलन गावात राहणारे शिवराम पाटील यांचे देखील त्यांच्या कुटुंबियांसोबत जमिनीचे वाद मागील वर्षापासून सुरू होते. मात्र, हे वाद सुटत नसल्याने आणि सततची भांडण आणि मानसिक ताण याना कंटाळून त्यांनी आपल्या पत्नीसह पाच वर्षांच्या मुलीला घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या भांडणाची माहिती देखील चिठ्ठीत लिहून ठेवली आहे. पत्नीने ही चिठ्ठी आपल्या माहेरच्यांना सोशल मीडियावर वर पाठवली. त्यामध्ये तब्बल तेरा जणांची नावे असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मुलीच्या कुटूंबियांनी केली आहे.
हेही वाचाः- एकाच नंबरच्या दोन नोटा ? व्यापाऱ्यांना ८० लाखाला गंडवले
घटना घडल्यानंतर आरोपींनी गावातून पलायन केले असून त्यांना अजुन अटक झाली नाही. यामुळे या जागेच्या वादाच्या प्रकरणात तीन जणांचे जीव जाऊन देखील आरोपी पोलिसांना सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत डायघर पोलिसांनी तपास चालू केला असला तरी याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. डायघर पोलीस स्थानकाचे वपोनी चंद्रकांत जाधव यांनी सुद्धा कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला. तर याच डायघर पोलीस स्थानकात अजून एक आत्महत्या घडली असून एक घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र पोलिसांकडून याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नाही.