महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ( बालभारती) च्या वतीने इयत्ता दहावीची पुस्तकं ४ एप्रिलपासून बाजारात उपलब्ध करून देण्यात आली असली, तरी अद्याप इयत्ता पहिली व आठवीची नवीन पुस्तकं उपलब्ध झालेली नाहीत. त्यामुळे ही पुस्तके बाजारात नेमकी कधीपर्यंत उपलब्ध होणार, अशा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना सतावत आहे?
यंदा दहावीबरोबरच पहिली आणि आठवीचा अभ्यासक्रमही बदलण्यात आला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचं वर्ष महत्त्वाचं असल्याने सर्व विषयांची पुस्तके एप्रिलमध्येच बाजारात उपलब्ध करून देण्यात आली. परंतु, या पुस्तकांच्या छपाईला वेळ लागल्याने पहिली आणि आठवीची पुस्तकांची छपाई उशीरा सुरू झाली. त्यामुळे अद्याप ही पुस्तकं बाजारात दाखल झालेली नाहीत.
जूनच्या १५ तारखेपासून शाळा सुरू होत असल्याने पाऊस, शाळेच्या इतर तयारीच्या घाईमुळे काही पालक मे महिन्यातच पुस्तकांची खरेदी करून ठेवतात. परंतु, मे महिना संपायला काहीच दिवस शिल्लक असतानादेखील नव्या अभ्यासक्रमाची पुस्तकंच बाजारात न आल्याने पालकांचा खोळंबा झाला आहे.
२०१७ -१८ या शैक्षणिक वर्षात फक्त २ इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती करायची असल्याने बालभारतीला हे वर्ष सोपं गेलं. परंतु, यंदाचं आणि पुढचं वर्ष बालभारतीला कठीण जाणार अाहे. कारण तीन इयत्तांच्या सर्व माध्यमांच्या पाठ्यपुस्तकांची छपाई
बालभारतीला करायची आहे.
सध्या बाजारात इयत्ता आठवीच्या इंग्रजी माध्यमाची केवळ इतिहास, इंग्रजी आणि हिंदी विषयाची पुस्तके उपलब्ध आहेत. तर मराठी माध्यमाची इंग्रजी आणि गणित विषयाची पुस्तके उपलब्ध आहेत. परंतु इयत्ता पहिलीचं एकही पुस्तक बाजारात उपलब्ध नसल्याची माहिती आयडियल बुक डेपोतून देण्यात आली.
पहिली व आठवीची पुस्तकं बाजारात आधीच उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी यांसह इतर माध्यमांची पुस्तकं बाजारात आली असून ती सर्वत्र उपलब्ध आहेत.
- सुनील मगर, संचालक, बालभारती
हेही वाचा-
सीबीएसईची पुस्तकंही आता पीडीएफ स्वरूपात!