Advertisement

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी 'झिरो बॅलन्स' बँक खातं


अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी 'झिरो बॅलन्स' बँक खातं
SHARES

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीकरीता झिरो बॅलन्स बँक खाते उघडण्यासाठी सर्व बँकांना निर्देश देण्यात येतील. केंद्र शासनामार्फत अल्पसंख्यांक समाजाला देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत व शिष्यवृत्तीसाठी राज्य शासनाच्या कोट्यामध्ये वाढ करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय व अल्पसंख्यांक विकास राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मंगळवारी विधानपरिषदेत दिली.

अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यास अडचण येत असल्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य सुधीर तांबे यांनी मांडली होती. राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचं सांगत ही शिष्यवृत्ती प्रक्रिया ऑनलाईन करण्याची मागणी होत असल्याचं त्यांनी म्हटलं.



या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना कांबळे म्हणाले, शिष्यवृत्ती देण्याची कार्यपद्धती सुलभच आहे. परंतु यात सदस्यांच्या अधिकच्या सूचना आल्यास त्यामध्ये आवश्यक ते बदल करण्यात येतील.

जिल्हास्तरावर प्रमुख बँकांची बैठक घेऊन संबंधितांना पालकमंत्र्यांच्या अन्वये सूचना देण्यात येतील. जेवढे अर्ज येतील तेवढ्या शिष्यवृत्ती देण्याबाबत तसेच राज्य शासनाचा अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठीचा कोटा २ लाख ७३ हजार आहे. हा कोटा अधिक मिळवून देण्याबाबत केंद्र शासनामार्फत प्रयत्न करण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. त्याचसोबत शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येईल तसंच उर्दू भाषेचं ज्ञान असलेले अधिकारी नियुक्त करण्यात येतील, असं आश्वासन राज्यमंत्र्यांनी दिलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा