मुंबई विदयापीठाचे रखडलेले निकाल लवकरात लवकर लागावेत यासाठी नवीन प्रभारी टीमकडे निकालाची जबाबदारी देण्यात आली. या टीमने १ महिन्यात मुंबई विद्यापीठाचे रखडलेले ४७७ निकाल लावले. त्यामुळे यावर्षी आता येणाऱ्या परिक्षांची जबाबदारी या नवीन टीमकडेच सोपवण्यात आली आहे.
यावर्षी द्वीतीय सत्रात ४५२ उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करायचे आहे. साधारणपणे १५ लाख उत्तरपत्रिकांचे निकाल ऑनलाईन पद्धतीनेच लावण्यात येणार आहेत. एकूण ४ लाखाहून अधिक विद्यार्थी या परिक्षा देणार आहेत. येत्या ३ ऑक्टोबरपासून या परीक्षा सुरू होतील. नोव्हेंबर महिना अखेरपर्यंत या परीक्षा सुरू राहणार आहेत. या सर्व निकालांची जबाबदारी ही नवीन प्रभारी कुलगुरूंच्या टीमकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे कुलगुरूंना या परिक्षेदरम्यानही एन्ट्री नाही, असंच दिसतंय.
ऑनलाईन पध्दतीमुळे निकाल रखडले, याची पुरावृत्ती होऊ नये म्हणून 'यापुढील परिक्षांचे निकाल ऑनलाईन पद्धतीने करण्यात येऊ नयेत,' अशी मागणी विद्यार्थी आणि प्राध्यापक करत होते. मात्र, ऑनलाईन असेसमेंट ही योग्य पद्धत असल्याचे खुद्द न्यायालयानेच सांगितल्यामुळे या पुढे होणाऱ्या परिक्षांचे निकालही ऑनलाईन पद्धतीनेच लावले जाणार आहेत.
या वर्षी होणाऱ्या परिक्षांची जबाबदारी आमच्याकडेच देण्यात आली आहे. ऑनलाईन असेसमेंट ही पद्धत योग्यच आहे. त्यामुळे यापुढील परिक्षांचे मूल्यांकन ऑनलाईन पद्धतीनेच केले जाणार आहे.
अर्जुन घाटुळे, प्रभारी परीक्षा संचालक
ऑनलाईन असेसमेंटच्या गोंधळानंतर कुलगुरू संजय देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. यानंतर कुलगुरूंच्या जागी प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदेंची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर प्रभारी प्र-कुलगुरू धीरेन पटेल, प्रभारी परीक्षा नियंत्रक अर्जुन घाटुळे यांची रिक्त जागी नियुक्ती करण्यात आली.
'कुलगुरू संजय देशमुख यांनी पुन्हा विद्यापीठात रूजू करून घ्यावे', या राज्यपालांना लिहिलेल्या पत्राला अद्याप राजभवनातून उत्तर आलेले नाही. त्यामुळे आता कुलगुरू स्वत:हून राजीनामा देणार, की त्यांची हकालपट्टी होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा