राज्यातील (maharashtra) वर्ग एक, दोन आणि तीनची भरती प्रक्रिया यापुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने करण्यात येणार आहे. यासाठीच आयोग अधिक बळकट, सक्षम करून त्याची फेररचना करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.
लोकसेवा आयोगाच्या रखडलेल्या परीक्षा, पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या याबाबतची लक्षवेधी राष्ट्रवादीचे शिवाजी गर्जे यांनी मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्य सरकारने वर्ग एक, दोन आणि तीनची सर्व पदभरती लोकसेवा आयोगाकडून करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे भविष्यात लोकसेवा आयोगाकडून मोठी पद भरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासाठी लोकसेवा आयोगाची संपूर्ण फेररचना करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव व्ही. राधा. यांच्याकडे फेररचनेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सर्व राज्यांच्या लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कामाचा अभ्यास करून त्यांनी फेररचना करण्याचे काम सुरू केले आहे. लोकसेवा आयोगाच्या तीन सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यापैकी एक जागा भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, उर्वरित दोन जागा भरण्यासाठी जाहिरात लवकरच काढली जाईल.
सदस्य संख्या वाढविण्याची गरज असेल तर वाढवली जाईल तसेच अधिक मनुष्यबळ दिले जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्यसेवा 2022 च्या परीक्षेतील पात्र उमेदवारांपैकी 14 जणांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत, त्यांनाही लवकरच नियुक्ती दिली जाईल.
आयोगाच्या बहुतेक परीक्षा इंग्रजी माध्यमातून (english medium) घेण्यात येतात. भविष्यात अभ्यास साहित्य मराठीत उपलब्ध करून दिला जाईल आणि परीक्षा इंग्रजीबरोबरच मराठी माध्यमातून (marathi medium) घेतल्या जातील.
शिवाय केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्यात येतात. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही वर्णनात्मक पद्धतीने घेण्यात येतील. यातून मराठी तरुणांना यूपीएससीच्या परिक्षा देणे सोयीचे होईल.
आरक्षणाचा प्रश्न आणि न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक विस्कळीत झाले . भविष्यात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) धर्तीवर राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
हेही वाचा