अकरावी प्रवेश प्रक्रियेत तिसऱ्या गुणवत्ता यादीतील प्रवेशाची मुदत नुकतीच संपली. या यादीतील प्रवेश मिळालेल्या ५४ हजार ७२७ विद्यर्थ्यांपैकी फक्त २१ हजार २१३ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला आहे. त्यमुळे प्रवेश न मिळालेल्या आणि यादीत नाव जाहीर होऊनही अद्याप प्रवेश न घेतलेल्या विद्यर्थ्यांची संख्या लाखोंच्या घरात असल्यानं यंदाही सरकारला विशेष फेरीचं आयोजन करावं लागणार आहे.
अकरावीच्या तिसऱ्या फेरीत जेमतेम ५० टक्के विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले असून आतापर्यंत तिन्ही गुणवत्ता यादी मिळून अद्याप १ लाख ९ हजार ६४४ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केले आहेत. प्रवेश समितीच्या नियोजित वेळापत्रकानुसार अकरावीच्या चार केंद्रीय फेऱ्या आणि त्यानंतर समुपदेशन फेऱ्या घेण्यात येतात. परंतु केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीनंतरही अद्याप लाखो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत.
यंदा दहावीचा निकाल वाढल्यामुळे अगदी ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांनाही तिसरी फेरी होऊनही प्रवेश मिळाला नाही. तिसऱ्या फेरीसाठी १ लाख १७ हजार २३४ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यातील ५४ हजार ७२७ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले होते. त्यातील २१ हजार २१३ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केले आहेत.
अकरावीच्या केंद्रीय फेऱ्या सुरू होताना २ लाख ४० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी केंद्रीय फेऱ्यांमधून आतापर्यंत १ लाख ९ हजार ६४४ विद्यार्थ्यांनी कॉलेजांत प्रवेश निश्चित केला आहे. आतापर्यंत तीन फेऱ्यांमध्ये प्रवेश न मिळालेल्या आणि प्रथम प्राधान्यक्रमाचे कॉलेज मिळालेले विद्यार्थी वगळून प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीत सहभागी होता येणार आहे. या फेरीसाठी ३ व ४ ऑगस्ट रोजी विद्यार्थी कॉलेजांचे पसंती क्रम बदलू शकणार आहेत.
गुणवत्ता यादी | प्रवेशपात्र विद्यार्थी | प्रवेशित विद्यार्थी |
---|---|---|
पहिली | १,२०,५८० | ५०,६२९ |
दुसरी | ७०,०७३ | ३७,८०२ |
तिसरी | ५४,७२७ | २१,२१३ |
एकूण | २,४५,३८० | १,०९,६४४ |