दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा 18 जुलैपासून सुरू होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाची दहावीची पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान तर बारावीची पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या जुलै - ऑगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार 18 जुलैपासून परीक्षा सुरू होणार आहेत.
लेखी पुरवणी परीक्षा पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येईल. तर दहावीची परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान होईल.
बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 18 जुलै ते 5 ऑगस्टदरम्यान होणार आहे. तसंच परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक हे मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे.
दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षेचं सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे.
परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडे छापील स्वरूपात देण्यात येणारं वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घेऊन विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावं.
अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेनं छपाई केलेलं तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातील वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असं आवाहन ओक यांनी केलं आहे.
या परीक्षेचे आवेदनपत्रे ही ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये होणाऱ्या परीक्षेची आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.