वर्सोवाच्या समुद्रकिनाऱ्यावर आणखी एक डॉल्फिन मासा मृतावस्थेत आढळून आला आहे. गेल्या दोन महिन्यात वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर अशा प्रकारे मृत मासा आढळल्याची ही तिसरी घटना आहे.
सोमवारी रात्री उशिरा वर्सोवा समुद्रकिनाऱ्याजवळ पाच फूट लांबीचा इंडो-पॅसिफिक हंपबॅक प्रजातिचा डॉल्फिन मासा मृतावस्थेत आढळल्याचं काही जणांनी पाहिलं. त्यानंतर त्यांनी याची माहिती वन विभागाच्या मॅन्ग्रोव्ह सेलच्या अधिकाऱ्यांना दिली.
वन विभागाच्या मॅन्ग्रोव्ह सेलचे सहाय्यक वन संरक्षक मकरंद घोडके यांनी सांगितलं की, सकाळी या समुद्रकिनारी वाकसाठी आलेल्या काही जणांनी येथे मृत डॉल्फिन आढळून आल्याची माहिती दिली. तेथे दुर्गंधी पसरली होती. या डॉल्फिनचं शवविच्छेदन करण्यात आलं असून अहवालात कोणतंही स्पष्ट कारण दिसून आलेलं नाही.
मागच्या गुरुवारी नवी मुंबई येथील उरणच्या समुद्रकिनारी 43 फूट लांबीचा ब्लू व्हेल मासा मृतावस्थेत आढळून आला होता. वन विभागाच्या मॅन्ग्रोव्ह सेलच्या अधिकाऱ्यांनी फ्रेट ट्रेलरच्या सहाय्याने त्या ब्लू व्हेल माशाला जमिनीत दफन केलं.