मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या सात तलावांमधील जलसाठा दिवसेंदिवस खालावू लागला आहे. परिणामी, पाणी कपात लागू होण्याची दाट शक्यता आहे. येत्या आठ दिवसात जलसाठ्याचा आढावा घेऊन पाणी कपात करण्यात येण्याची शक्यता आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांतील पाणीसाठा वेगाने आटत असून सातही धरणात मिळून सध्या केवळ ९.७६ टक्के पाणीसाठा आहे.
गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा कमी आहे. पावसाला अद्याप सुरुवात न झाल्यामुळे अखेर पाणी कपातीच्या निर्णयाची चर्चा जल अभियंता विभागात सुरू झाली आहे.
मात्र पाऊस पडण्याची चिन्हे दिसत नाहीत. येत्या काही दिवसात पाऊस पडला तरी धरणक्षेत्रात पाऊस सक्रिय होऊन प्रत्यक्ष पाणीसाठा वाढण्यासाठी वेळ लागणार आहे. तोपर्यंत ९ टक्के पाणीसाठा अपुरा पडू शकतो. त्यामुळे किमान १० टक्के पाणी कपात किंवा पाणी पुरवठ्याच्या वेळेत कपात केली जाण्याची शक्यता आहे. पुढच्या आठ दिवसात जलसाठ्याचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
हायड्रॉलिक विभागाच्या वरिष्ठ नागरी अधिकाऱ्याने सांगितले की, ते जुलै अखेरपर्यंत पाणीपुरवठा करू शकतात. येत्या 15-20 दिवसांत असमाधानकारक पाऊस झाल्यास मोठे जलसंकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे भविष्यातील गरज लक्षात घेऊन त्यांना पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागणार आहे.
मे महिन्यात, भारतीय हवामान विभागाने (IMD) 10-11 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होईल आणि 99 टक्के पाऊस अपेक्षित होता. मात्र, पावसाची चिन्हे नसल्याने तलावाची पातळी तळाला जात आहे.
तलावातील सध्याची पाण्याची पातळी (दशलक्ष लिटरमध्ये)
मोडक सागर - 46,753
तानसा - 6289
मध्य वैतरणा - १७,९६१
भातसा - 64,258
विहार - 3878
तुळशी - 2103
23 जून रोजी मागील तीन वर्षांचा पाणीसाठा
वर्ष दशलक्ष लिटर
2022 - 1,41,242
2021 - 2,21,890
2020 - 1,48,059
हेही वाचा