प्रचंड ताकद, धडकी भरवणारं सामर्थ्य आणि हेवा वाटावी अशी ऐट...वाघाची हीच गुणवैशिष्ट्य त्याला 'स्पेशल' बनवतात. त्याची हीच वैशिष्य भारताची ओळख बनावी या हेतून वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता देण्यात आली. त्याचं जतन आणि संवर्धन होण्यासाठी 29 जुलै हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. संपूर्ण जगभरात जागतिक व्याघ्र दिन म्हणून हा दिवस पाळला जातो. 2010 मध्ये झालेल्या सेंट पीटर्सबर्ग व्याघ्र परिषदेमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. जगभरातल्या व्याघ्रप्रकल्पांचं संवर्धन करणे आणि त्याबद्दल जनजागृति करणे हा यामागचा उद्देश आहे.
जवळपास संपूर्ण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वाघाचं अस्तित्व असल्याचं दिसून येतं. यामध्ये काही महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प, जंगल परिसर आणि तिवरांच्या जंगलांचा समावेश होतो. पण दुर्दैवाने वाघाचा समावेश नामशेष होत चाललेल्या प्रजातींमध्ये करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय पर्यावरण संवर्धन संघ अर्थात इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर(आयसीयुएन)च्या यादीमध्ये वाघाचा समावेश करण्यात आला असून वाघांच्या शिकारीचं वाढतं प्रमाण आणि नष्ट होत जाणारी जंगलं त्यासाठी कारणीभूत असल्याचं मानलं जातं.
1972मध्ये रॉयल बेंगॉल टायगर अर्थात वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता देण्यात आली. या कायद्यानुसार भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार वाघांच्या संवर्धनासाठी कठोर पावले उचलण्याचे अधिकार सरकारी संस्थांना मिळाले. लागलीच 1973मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरु करण्यात आला. आजघडीला देशभरात तब्बल 48 व्याघ्रप्रकल्प असून त्यापैकी बहुतेक ठिकाणी चांगले प्रयत्न आणि जीआयएस(GIS) प्रणालीच्या मदतीने वाघांची संख्या वाढवण्यात यश आले आहे. या प्रकल्पांमध्ये वाघांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी सक्त कायदे आणि स्पेशल टास्क फोर्स नेमण्यात आली आहे. राजस्थानमधील रणथंबोर व्याघ्र प्रकल्प हे त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणता येईल!
जीआयएस प्रणाली कशी काम करते? यासंदर्भात एसरी आयलॅंडने एक माहितीपूर्ण व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला आहे.
मुंबईच्या संजय गांधी नॅशनल पार्कमधील एकमेव 13 वर्षीय रॉयल टायगर पलाशचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. त्याने बसंती वाघिणीसोबत तीन बछड्यांना जन्म दिला होता. त्यामुळे पलाशच्या रुपाने मुंबईत वाघांचं अस्तित्व आहे. मात्र त्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावले उचलण्याची अपेक्षा वन्यप्रेमी व्यक्त करत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातलं ताडोबा अभयारण्य हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. मुंबईपासून 845 किलोमीटर अंतरावर असलेल्या या प्रकल्पामध्ये वाघांच्या जतन आणि संवर्धनासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहे.
नदीम कादरी या व्यक्तीने ताडोबा अभयारण्यात त्याला आलेला अनुभव व्हिडिओ स्वरूपात यूट्यूबवर शेअर केला आहे
हेही वाचा
'वाघा'शी शत्रुत्व नाही, मित्रत्व करा! सरकारचा नवा संदेश
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)