हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये मुंबईसह ( Mumbai Rain) उपनगरीय क्षेत्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Maharashtra Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तर, कोकणातही मान्सूनच्या दृष्टीनं पूरक स्थिती निर्माण झाली असून, उत्तर कोकणाला पावसाचा तडाखा बसताना दिसणार आहे. फक्त कोकणच नव्हे, तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाटमाथ्यावरील परिसरामध्येही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यातील पावसाचे एकंदर तालरंग पाहता हवामान विभागानं ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुण्यातील घाटमाथ्यावरील भागांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, नाशिक, मुंबई, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाडा आणि विदर्भात परिस्थिती वेगळी नाही. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता आहे. राजस्थानपासून पश्चिम बंगालपर्यंत मान्सून सक्रिय झाला असून, त्यामुळं उत्तर मध्य महाराष्ट्रावर चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होताना दिसत आहे.
गुरुवारी दिवसभर घेतलेल्या विश्रांतीनंतर शुक्रवारी पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली. दादर, परळ, भायखळा भागात सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तसेच वडाळा, सायन, दादर टिटीमध्ये पाऊस सुरु झाला असून पाणी साचायला सुरुवात झाली आहे.
रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. त्यामुळे कामावर निघालेल्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. तसेच हार्बरवरील लोकल ट्रेन देखील 10 ते 15 मिनिटांनी उशिरा धावत आहे.
दरम्यान, आजपासून मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढणार, असा इशारा भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईकरांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.
हेही वाचा