मुंबईसह कोकणात रायगड, अलिबाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभाग (IMD) ने अंदाज वर्तवला आहे की, शहर आणि त्याच्या उपनगरात आज (28 मे) दुपार किंवा संध्याकाळपर्यंत ढग दाटून येतील. तसेच शहर आणि मुंबई महानगर प्रदेश (MMR) भागात हलका पाऊस किंवा रिमझिम पाऊस अपेक्षित आहे.
आजचे तापमान किमान 29 अंश सेल्सिअस ते कमाल 33 अंश सेल्सिअस पर्यंत असण्याची शक्यता असून सरासरी तापमान 31 अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिर राहण्याची शक्यता आहे. नैऋत्य दिशेकडून 20.4 किमी/ताशी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
येत्या काही दिवसांत किमान तापमानात किंचित घट होऊन बुधवारी 28 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. आठवड्याच्या शेवटी किमान तापमानात 28-29 अंश सेल्सिअसच्या दरम्यान चढ-उतार होईल, असा अंदाज हवामान संस्थेने वर्तवला आहे. कमाल तापमान 32-34 अंश सेल्सिअस दरम्यान राहून घसरण्याची अपेक्षा आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेचं प्रमाण वाढल्याचं दिसून येतंय. मुंबईकरांना देखील बराच काळ उकाड्याचा सामना करावा लागला. यावेली काही दिवसांपासून हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. तापमानात घट झाली असली तरी उष्णतेचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागला. अशातच आता पुढील तीन- चार दिवस ढगाळ वातावरण राहील तसेच हलका पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मान्सून 31 मेपर्यंत केरळात, 10 जूनपर्यंत मुंबईसह कोकणात तर 15 जूनपर्यंत कोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच मराठवाडा आणि विदर्भात हातपाय पसरेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.