आतापर्यंत तुम्ही अनेक गणपती पाहिले असतील. मेंटॉसच्या गोळ्या, कडधान्यं, साबूदाणे, लाकूड या साहित्यांचा वापर करून अनेक गणपती साकारण्यात आले आहेत. पण स्वच्छ भारत उपक्रमाने प्रेरित होऊन नवी मुंबईच्या सीवुड्स ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये बाप्पाची हटके मूर्ती स्थापित केली आहे.
"स्वच्छता ही भक्तीपेक्षा जास्त महत्त्वाची आहे" ही जुनी म्हण सर्वांनाच अभिप्रेत असेल. या वाक्यप्रचारानुसार मॉलमध्ये उभारण्यात आलेली ही मूर्ती प्लास्टीकच्या बाटल्यांपासून साकारण्यात आली आहे. कलाकार आबासाहेब शेवाळे आणि त्यांच्या टीमनं ही मूर्ती तयार केली आहे. १० हजारपेक्षा जास्त प्लास्टिकच्या बाटल्यांचा उपयोग करून गणेशमूर्ती बनवण्यासाठी आली आहे. मूर्ती तयार करण्यासाठी लाल, काळ्या, निळ्या, हिरव्या, पिवळ्या आणि पांढऱ्या रंगात रंगविलेल्या २०० मिलीच्या बाटल्या वापरण्यात आल्या आहेत.
मूर्ती बनवण्यासाठी वापरण्यात आलेल्या ३०० किलोग्रॅम प्लास्टिकचा पुर्नवापर केला जाणार आहे. त्यानंतर त्याचं रुपांतर वंगण इंधनात केलं जाईल. या प्लास्टिकच्या बाटल्या एसजीसी मॉलनं एक देणगी मोहीमेअंतर्गत जमा केल्या. या मोहिमेअंतर्गत त्यांनी लोकांना वापरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या दान करण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे ही मूर्ती साकार होऊ शकली.
या गणपती मूर्तीची नोंद युनिक बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात येणार आहे. अशा या भारतातल्या पहिल्याच १० हजार ८०० प्लास्टिक बॉटलनं साकारलेल्या बाप्पाचं दर्शन तुम्ही १२ सप्टेंबर २०१९ पर्यंत घेऊ शकता.
परोपकारी देवतेचे आगमन लाखो लोकांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणते, परंतु प्लास्टिकच्या वापरामुळे आणि प्लास्टिकच्या कचऱ्याच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते. एक जबाबदार कॉर्पोरेट या नात्यानं एसजीसी मॉलनं प्लास्टिकच्या हानिकारक प्रभावाविषयी आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाविषयी जनजागृती पसरवण्याचं काम यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं केलं आहे.
कुठे
: सीवुड्स ग्रँड सेंट्रल मॉल, नवी मुंबई
कधी : १२ सप्टेंबरपर्यंत
वेळ : सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत
हेही वाचा