परळ - तृतीयपंथीयांच्या सामाजिक उद्धारासाठी काम करणाऱ्या किन्नर माँ संस्थेचा दुसरा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या किन्नरांना एकजूट करण्यासाठी 20 सप्टेंबर 2014 रोजी किन्नर माँ संस्थेची स्थापना करण्यात आली होती. परळ येथील दामोदर हॉल मध्ये झालेल्या कार्यक्रमात संस्थेच्या उपाध्यक्ष गुरूमहाराणी आणि मान्यवरांच्या हस्ते केक कापून संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी किन्नरांनी सांस्कृतिक कार्यक्रमामधून आपल्यातील विविध कलागुणांचे प्रदर्शन केले.
सरकार आणि हायकोर्टाकडून त्यांना तृतीयपंथीय अशी कायदेशीर मान्यता मिळालीय. पण घरोघरी, सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या किन्नरांना तुच्छतेची वागणूक दिली जाते. अशा वंचित किन्नर समाजासाठी किन्नर माॅं ही संस्था आशेचा किरण ठरतेय. दोन वर्षांपूर्वी काही किन्नरांनी मिळून या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचा दुसरा वर्धापन दिन नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला. किन्नरांना आपल्या उदरनिर्वाहासाठी घरोघरी, सार्वजनिक ठिकाणी भटकून लोकांसमोर हात पसरावे लागतात. अशा किन्नरांना एकजूट करण्याचं, त्यांना मदत करण्याचं आणि त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याचं काम किन्नर माँकडून करण्यात येतंय. या कार्यक्रमात तृतीयपंथीयांनी आपल्यातील कलागुणांचं दर्शनही घडवलं. आपल्यातील नृत्यकौशल्यानं उपस्थिताची वाहवाही मिळवली. आता पुढच्या पालिका निवडणुकीत किन्नरांनाही प्रतिनिधित्व करता यावं, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता किन्नर माँ सारख्या अजून काही संस्था पुढे आल्यास सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या तृतीयपंथीयाच्या समस्या थोड्याफार तरी सुटतील.