महिषासूराच्या नाशासाठी अवतार घेणाऱ्या दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र. २१ सप्टेंबर म्हणजेच गुरुवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. नवरात्रीत ९ दिवस व्रत ठेवून देवीची मनोभावे पूजा केली जाते. महाराष्ट्रात माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि वणीची सप्तश्रृंगी देवी अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत. येथे नवरात्रीत ९ दिवस मोठी यात्रा भरते. भक्त देवीच्या दर्शनासाठी लांबून येतात. पण प्रत्येकाला या देवींचे दर्शन घेणे शक्य होत नाही. मुंबईकरांना तर कामातून वेळ काढून या देवींच्या दर्शनासाठी जाणे फारच अवघड असते. पण मुंबईत देखील सांस्कृतीक आणि धार्मिक महत्त्व टिकवून ठेवणारी देवीची अनेक मंदिरे आहेत, जिथे जाऊन तुम्हाला देवींचे दर्शन घेता येऊ शकते. अशाच ९ मंदिरांची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.
मुंबईची ग्रामदैवत, अशी मुंबादेवीची ओळख. मुंबादेवीच्या नावावरूनच मुंबईचे नामकरण झाल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. मुंबादेवी मुंबईतील आद्य रहिवासी कोळी समाजाची आराध्य दैवत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून मुंबादेवीचे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येते. नवरात्रीत पाठ वाचनाबरोबर नवमीला हवन केले जाते.
मुंबादेवी मंदिराचे दगडी बांधकाम जुन्या वैभवसंपन्न मंदिरांची आठवण करून देते. मंदिराच्या गाभाऱ्यातील जुन्या धाटणीचे कोरीव काम लक्ष वेधून घेते. मंदिरातील देवीची मूर्ती वालुकामय स्वरूपाची असून तिला दागिन्यांनी मढवलेली आहे. मंदिरात दोन गाभारे असून एका गाभाऱ्यात मुंबादेवी आणि दुसऱ्या गाभाऱ्यात अन्नपूर्णा तसेच जगदंबा मातेची मूर्ती आहे.
६०० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी टर्मिनलच्या जागी मुंबादेवीचे जुने मंदिर होते. इंग्रजांच्या काळात मुंबई औद्योगिक नगरी म्हणून उदयाला येत होती. दळणवळणासाठी योईस्कर म्हणून छत्रपती टर्मिनल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी इंग्रजांनी स्थानिक कोळी समाजाला विनंती करून काळबादेवी इथल्या भूलेश्वर परिसरात मंदिर बांधले. त्यानंतर १९१५ साली देवीची नव्याने प्रतिष्ठापना करण्यात आली.
मुंबईतल्या काळबादेवी परिसरातील मुख्य बाजारपेठेत असलेली ३०० वर्षांपूर्वीची महाकालिमाता काळबादेवी म्हणून ओळखली जाते. काळबादेवी परिसरातील बाजारपेठेत ही देवी २२५ वर्षांपासून आहे. यापूर्वी काळबादेवीचे मंदिर आझाद मैदानात होते. ३०० वर्षांपूर्वी रघुनाथ कृष्णा जोशी या गृहस्थांनी आझाद मैदान इथे देवीची प्रतिष्ठापना केली होती. पण रघुनाथ यांचे निधन झाल्यानंतर ब्रिटिशांच्या दबावामुळे हे मंदिर काळबादेवी परिसरात हलवण्यात आले.
काळबादेवी मंदिरात नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा केला जातो. काळबादेवीला मांसाहारी नैवैद्य चालत नाही. परंपरेनुसार धार्मिक विधिवत पूजा केली जाते. नवमीला देवीसमोर हवन केले जाते. मार्गशीर्षात कृष्ण पक्षातील अमावस्येला काळबादेवीची मोठी जत्रा भरते. काळबादेवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असते.
मुंबईतल्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक म्हणजे महालक्ष्मी मंदिराची देखील चांगली ख्याती आहे. १७८५ साली मंदिरात देवीची स्थापना करण्यात आली. या मंदिरात महालक्ष्मी, कालिका, महासरस्वती या तीन देवींच्या मूर्ती आहेत. मंदिरात नवरात्र मोठ्या उत्साहात साजरा केली जाते. सकाळी ७ वाजता आणि सायंकाळी ७.३० वाजता मुख्य आरती, सकाळी ६.३० वाजता धूप आरती आणि रात्री १० वाजता शेजारती असा मंदिरातील कार्यक्रम असतो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केल्यानंतर मंदिर पूर्ण दिवस सुरू असते. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
१८८५ साली वरळी आणि मलबार हिल या दोन्ही भागांना जोडण्याचे काम इंग्रज इंजिनियर करत होते. पण त्या कामात विघ्न येत होते. या प्रोजेक्टचे मुख्य इंजिनियर रामजी शिवाजी प्रभू यांना वरळी जवळच्या समुद्रात लक्ष्मीच्या मूर्तीचे स्वप्न पडले. स्वप्नात दिसलेल्या जागी त्यांनी मूर्तीचा शोध घेतला. त्यानंतर तिथे त्यांना लक्ष्मीची मूर्ती सापडली. म्हणून त्याच जागी मंदिर बांधण्यात आले आणि मूर्तीची स्थापना करण्यात आली.
पायधुनी इथल्या महाकाली मातेच्या मंदिराची स्थापना १७६२ साली करण्यात आली होती. २५० वर्षांपासून ही देवी या परिसरात वास करते असा तिथल्या रहिवाशांचा विश्वास आहे. मुंबईत ब्रिटिशकालीन विहरी आहेत. या विहरींमध्येच या देवीचा उगम झाला. त्यानंतर तिथेच देवीची स्थापना करण्यात आली.
या मंदिरात नवरात्रोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. महाकाली देवी असली तरी देवीला शुद्ध शाकाहरी नैवेद्य दाखवला जातो. नवरात्रोत्सवात मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते.
मुंबईतल्या सात बेटांपैकी माहीम हे एक बेट. या बेटावर वसलेले शीतलादेवीचे सुंदर मंदिर. कोळी समाजाचे कुलदैवत असलेल्या शीतलादेवीचे मंदिर साडेतीनशे वर्षे जुने आहे. मंदिरातील देवीची मूर्ती पाषाणात घडवलेली आहे. मूर्तीवर चांदीचा मुखवटा चढवलेला आहे.
मंदिराच्या आवारात महाकाली, हरिहर, पुरातन विठ्ठल-रखुमाई मंदिर, साईबाबा तसेच खोकला बरा करणाऱ्या खोकला देवीचे मंदिर आहे. तसेच सारस्वत समाजाची कुलदेवता शांतादुर्गा देवीचे मंदिर आहे. मंदिरात रोज सकाळी ८.३० आणि रात्री ७.३० वाजता ट्रस्टतर्फे आरती केली जाते. नवरात्रीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
माहिमची ग्रामदेवता म्हणून सातआसरा मनमालादेवीची ख्याती आहे. हे पुरातन मंदिर असून १५०-२०० वर्षे झाली असावीत. मनमाला देवीचे मंदिर आहे तिथे तलाव होते. त्या तलावातून मनमाला देवीची मूर्ती प्रकट झाल्याचे म्हटले जाते. यासोबतच खोकलादेवी, शितलादेवी, जरीमरी, केवडावती, चंपावती, मनमाला देवी प्रकट झाल्याचे म्हटले जाते. तलावाला विहिरीचे रूप देण्यात आले आहे आणि विहिरीच्याच बाजूला मंदिर बांधून मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे.
नवरात्रीमध्ये देवीला चांदीची छत्री घातली जाते. नवरात्रीत भजन, हवन केले जाते तसेच रोज महिलांचे भजन होते.
प्रभादेवी मंदिरापासून थोड्याच अंतरावर जाखादेवीचे मंदिर आहे. मंदिराचे मूळ रत्नागिरी गावातील गणपतीपुळे इथले आहे. मंदिराची स्थापना अनंत विठ्ठल कवळी यांनी १०० वर्षांपूर्वी केली. अनंत कवळी राहत असलेल्या घराजवळच्या तलावात जाखादेवीची पुरातन मूर्ती सापडली. मूर्ती भग्नावस्थेत असल्याने त्यांनी संगमवरी मूर्तीची स्थापना केली. कवळी कुटुंबाकडे देवीच्या आरतीचा तसेच वस्त्र आणि अलंकार करण्याचा मान आहे.
नवरात्रीत होमभवन केले जाते आणि संध्याकाळी आरती असते. नवसाला पावणारी देवी अशी जाखादेवीची ख्याती असल्याने स्त्रीया नवरात्रीत देवीला साड्या अर्पण करतात. नवरात्रोत्सवात मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते.
गोलफादेवी हे उंच टेकडीवर वसलेले कोळी बांधवांचे मंदिर आहे. मंदिराची बांधणी बिंब राजाने केल्याचे इथले रहिवासी सांगतात. मंदिरात साकबादेवी, गोलफादेवी आणि हरबादेवीची मूर्ती आहे. काळ्या पाषाणातील ही मूर्ती आहे. नवरात्रीत पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असते. नवरात्रीत मंदिराच्या परिसरात गरबा खेळला जातो.
अजूनही मंदिरात देवीला कौल लावण्याची प्रथा आहे. कोळीबांधव मासेमारीस जाताना किंवा इतर शुभ कामाला जाताना देवीला कौल लावतात. देवीचा शाकंबरी पौर्णिमेला जन्म दिवस असतो. देवीचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
विरार इथल्या टाटोळे तलावाच्या परिसरात असलेली देवी जागृत स्थान म्हणून ओळखले जाते. १९६൦ साली या मंदिराची स्थापना करण्यात आली होती. ब्रिटीश सरकारने नियुक्त केलेल्या बैरागी कुटुंबाची सातवी पिढी मंदिराचे व्यवस्थापन पाहत आहे. ब्रिटीशकाळात विरार स्थानकाचे बांधकाम सुरू होते. पण या कामात देवीच्या मूर्तीचा अडथळा येत होता. त्यामुळे देवीचे मंदिर हलवण्याचे प्रयत्न सुरू झाले. पण क्रेनने देवीची मूर्ती हलवता येत नव्हती. तेव्हा हनुमंतदास बैरागी यांनी दैवी शक्तीने मूर्ती स्थलांतरीत केली.
नवरात्रीत पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. त्यानंतर हरबा देवीची आरती आणि अष्टमीला होमहवन, गरबा असे कार्यक्रम केले जातात. लहान मुलांना होणाऱ्या कांजण्या, देवी असे रोग देवी बरे करते असा इथे येणाऱ्या भाविकांचा विश्वास आहे. त्यामुळे इतर दिवशीही मंदिरात भाविकांची गर्दी असते.
हेही वाचा -
जागर महिलाशक्तीचा : देवाला देवपण देणाऱ्या कलेचा वारसा जपणारी लेक
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)