कांदिवली - शताब्दी रुग्णालयात डॉक्टर तपासायला न आल्यामुळे संतापलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. सोमवारी सकाळपासून डॉक्टर रुग्णांना तपासायला येत नसल्याचं रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितलं. त्याबाबत नातेवाईकांनी सुरक्षा रक्षकांकडे विचारणा केली असता, डॉक्टरांची मिटिंग सुरु असल्याचं सांगण्यात आलं.
याबाबत रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमुख अधीक्षक कृष्णकांत पिंपळे यांना विचारले असता ते म्हणाले की, शनिवारी रात्री अतिदक्षता विभागातील डॉ . उमेश वाघमारे यांच्यावर एका रुग्णाच्या नातेवाईकांनी चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सोमवारी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केलं.
डॉक्टरांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा
मात्र या आंदोलनाचा परिणाम इतर रुग्णांना सहन करावा लागला. याबाबत कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, चौघांना अटकही झाली आहे. आठ दिवसांत सुरक्षा न पुरवल्यास पुन्हा काम बंद करण्याचा इशारा डॉक्टरांनी दिलाय. दुपारी 12 नंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे डॉक्टर पुन्हा कामावर रुजू झाले आणि रुग्णसेवा पूर्ववत झाली.