भाजी किंवा वरणात चुकून एखादा केस आला, तरी आपण ते अख्खं ताट बाजूला सरकवतो. परंतु एका २० वर्षांच्या तरूणीला केस खाण्याची इतकी सवय जडली होती की तिनं थोडे थोडे करत चक्क ७५० ग्रॅम वजनाचे केस गिळून घेतले. अखेर शस्त्रक्रिया करून हे केस बाहेर काढावे लागले. पण, या तरूणीनं एवढे केस कसे काय गिळले? या जिज्ञासेतून डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यावर तिला 'रॅपन्झेल सिंड्रोम' हा मानसिक आजार असल्याचं उघड झालं आहे.
अंबरनाथला राहणाऱ्या या तरूणीच्या पोटात सतत दुखायचं. शिवाय तिचं वजनही अचानक कमी होऊ लागलं होतं. अनेक ठिकाणी उपचार करूनही तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं तिनं घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात ऑगस्टमध्ये धाव घेतली. तेव्हा तिचं वजन फक्त ३० किलो होतं. डॉक्टरांनी केलेल्या सिटी स्कॅनमध्ये या तरूणीच्या पोटात २५ सेमी लांब ७५० ग्रॅमचा केसाचा गुंता असल्याचं डॉक्टरांना समजलं.
एवढंच नव्हे, तर डॉक्टरांनी चौकशी केल्यावर या मुलीला केस खाण्याची सवय असल्याचं लक्षात आलं. हा केसांचा गुंता पोटातील नाजूक भागात अडकल्यानं हा गुंता काढणं डॉक्टरांसाठी आव्हानात्मक होतं. मात्र शस्त्रक्रियेच्या माध्यमातून हा गुंता बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं.
या मुलीला दीर्घकाळापासून केस खाण्याची सवय होती. केसाचं शरीरात पचन होत नाही आणि तो शौचाद्वारे ते बाहेरही जात नाही. पोटात केसांचा गुंता असल्यानं पोट भरल्यासारखं वाटून मुलीला भूक लागत नव्हती. त्यामुळं अन्नही जात नव्हतं. अशा प्रकरणांत रुग्णाला मानसोपचारतज्ज्ञाची आवश्यकता असते.
- डॉ. विद्या ठाकूर, वैद्यकीय अधिक्षक, राजावाडी रुग्णालय
जगभरात २०१६ पासून या आजाराचे केवळ ८८ रुग्ण सापडले आहेत. या आजाराला रॅपन्झेल सिंड्रोम (दुर्मिळ आतड्यासंबंधातील आजार) असं म्हणतात.
हे देखील वाचा -
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)