मुंबईतील मालाड पूर्वेकडील परिसर हा नेहमीच गजबजलेला असतो. आजूबाजूला उंचच उंच इमारतींचे इमले देखील पहायला मिळतात. अशाच या सिमेंटच्या जंगलात कुणीही कल्पना केली नसेल असा आयुर्वेदिक खजाना तयार करण्यात आला आहे. जवळपास 1.5 एकरच्या जमिनीत 200 हून अधिक आयुर्वेदिक वनसंपत्ती या ठिकाणी लावण्यात आली आहे. हे सगळे शक्य झाले आहे ते 73 वर्षीय डॉक्टर राज मर्चंट यांच्यामुळे ! गेल्या पाच दशकांपासून ते या गार्डनची निगा राखत आहेत आणि त्याचा उपयोग लोकांनादेखील होत आहे.
डॉ. राज मर्चंट हे निसर्गाेपचार तज्ञ्ज आहेत. वनस्पतींचे चांगले जाणकार असल्यामुळे त्यांनी बागेमध्ये सर्व रोगांवर उपचार करणाऱ्या वनस्पतींची लागवड केली आहे. अस्थमा, डायबेटीज यासारख्या अनेक आजारांवर उपचार करणाऱ्या वनस्पतींची त्यांनी लागवड केली आणि ज्याचा फायदा सर्वसामान्यांना होत आहे.
कांदा आपल्या बुद्धीसाठी फायदेशीर असतो. मेहेंदीची पाने ही यकृता(लिव्हर)साठी उपयोगी असतात. मात्र, लोकांना त्याची माहिती नसल्याने त्याचा योग्य वापर होत नसल्याचे मर्चंट यांनी सांगितले आहे.पोटाच्या कॅन्सरने पीडित असलेल्या मुकेश मोदी यांना डॉक्टर मर्चंट यांनी याच बागेतील आयुर्वेदिक वनस्पतींच्या वापराने बरे केले. मोदी यांनी अनेक मोठमोठ्या रुग्णालयात उपचार केले. मात्र, काहीच फरक न पडल्याने अखेर मर्चंट यांच्याकडे जाणे पसंत केले आणि त्याचा त्यांना फायदा देखील झाला.
आज मर्चंट यांच्या बागेत शतावरी, रुई, तुळस, कडीपत्ता, बेल, जैन आले, हट्टा जोडी, लिंगुडी बांबू, कडुलिंब, आवळा यांसारख्या अनेक वनस्पतींची लागवड झालेली पहायला मिळत आहे.
देशातीलच नाही तर विदेशातील नागरिकांनी देखील मर्चंट यांच्या या बागेला भेट दिली आहे. बॉलिवूड कलाकार, उद्योगपती, राजकारण्यांना देखील त्यांच्या या बागेने भुरळ घातली आहे. मग, तुम्ही देताय ना या आयर्वेदिक खजिन्याला भेट !