नायर रुग्णालयातील 'एमआरआय' सेंटरमध्ये रुग्णासोबत गेलेल्या राजेश मारु या तरूणाचा काही महिन्यांपूर्वी दुर्देवी मृत्यू ओढावला होता. या प्रकरणाविरुद्ध कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायलयात धाव घेतली आहे. न्यायलयानं या याचिकेवर सुनावणी करताना नायर रुग्णालय, मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला एका आठवड्यात भूमिका मांडण्याचे आदेश दिले आहेत.
राजेशच्या आई-वडिलांसह त्याची बहिण लीना मारू यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढं यावर सुनावणी झाली.
२८ जानेवारी २०१८ ला राजेश त्याच्या बहिणीच्या सासूला बघायला नायरमध्ये गेले होते. त्या दरम्यान रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने त्यांना 'एमआरआय' रूममध्ये ऑक्सिजनचा सिलेंडर आणायला सांगितलं. 'एमआरआय' रूममध्ये धातूची वस्तू नेण्यास मज्जाव असतो. मात्र तरीही वॉर्डबॉयने 'एमआरआय' मशीन बंद असल्याचं सांगत त्यांना सिलेंडर आत आणण्यास सांगितलं. वॉर्डबॉयच्या सांगण्यावर विश्वास ठेवून राजेश यांनी सिलिंडर आत नेला.
पण आत 'एमआरआय' मशीन सुरू असल्यानं राजेश सिलेंडरसकट मशीनमध्ये ओढले गेले. त्यांचा हात मशिन आणि सिलेंडरमध्ये अडकला आणि त्याचं वेळी सिलेंडरचा व्हॉल्व्ह लीक झाल्याने ऑक्सिजन बाहेर आला. हा ऑक्सिजन प्रचंड प्रमाणात नाकातोंडात गेल्यानं त्याचा देह निळा पडला आणि ते बेशुद्ध झाले. त्यानंतर वॉर्डबॉयच्या मदतीनं मशीन बंद करून राजेशला बाहेर काढण्यात आलं आणि ट्रॉमा सेंटरमध्ये हलविण्यात आलं, मात्र, उपचारादरम्यान राजेशचा मृत्यू झाला.
राजेश हा कुटुंबातील मुख्य कमावता पुरूष होता. परंतु रुग्णालयाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळं आम्ही आमचा माणूस गमावला. त्याच्या अचानक जाण्यानं कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. मुख्य म्हणजे आम्हाला सध्या प्रचंड मनस्ताप सहन करावं लागत असून आम्हाला रुग्णालयानं लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी विनंती याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
हेही वाचा-
पालिका हॉस्पिटलमधल्या MRIचं वास्तव, रूग्णांना ३ महिने वेटिंग!
नायर एमआरआय प्रकरण - रेडिओलॉजिस्ट संघटना डॉ. शहांच्या बाजूने