टीबी (क्षय) अाजारावरील उपचार मधूनच सोडणाऱ्यांची संख्या मुंबईत वाढत असल्याचं अाढळून अालं अाहे. टीबी उपचार (DOTS) पूर्णपणे न घेता मध्येच उपचार बंद करणाऱ्या रुग्णांची संख्या २०१३ मधील १२ टक्क्यांवरून २०१७ मध्ये १५ टक्के वाढली अाहे. प्रजा या सामाजिक संस्थेने (एनजीओ) केलेल्या संशोधनातून ही गंभीर बाब समोर अाली अाहे.
प्रजाने एक श्वेतपत्रिका काढून टीबी रुग्णांच्या सद्यपरिस्थितीवर प्रकाश टाकला अाहे. या श्वेतपत्रिकेनुसार, टीबी उपचार पूर्णपणे न घेणाऱ्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली अाहे. तर वर्ष २०१७-१८ मध्ये मुंबईत ५५ हजार १३० टीबी रूग्ण वाढले अाहेत. वर्ष २०१३ -१४ पासून अातापर्यंत मुंबईत टीबी रुग्णांची संख्या ३३ टक्क्याने वाढली असल्याचं दिसून येत अाहे. दरवर्षी प्रजा संस्था वार्षिक अारोग्य अहवाल प्रकाशित करते. मुंबई महापालिकेच्या अारोग्य विभागाकडून माहिती अधिकाराखाली अारोग्यविषयक अाकडेवारी मिळवून हा अहवाल तयार केला जातो.
याबाबत प्रजाचे मिलिंद म्हस्के म्हणाले की, राज्यात टीबी अाजारावरील उपचार घेणारे रुग्ण मध्येच अापला उपचार बंद करत अाहेत. हे रुग्ण पूर्णपणे उपचार न घेता मध्येच उपचार का बंद करत अाहेत याची माहिती राज्य सरकारने घ्यायला हवी. दरम्यान, प्रजाच्या या वर्षीच्या श्वेतपत्रिकेत मृत्यूची अाकडेवारी मात्र समाविष्ठ नाही. कारण याबाबतची माहिती त्यांना माहिती अधिकारात मिळू शकली नाही.
हेही वाचा -
अमन बनण्यासाठी बीडवरून रूक्सार मुंबईत दाखल
ई-फार्मसीचा मार्ग मोकळा? अंतिम मसुदा जाहीर