मुंबईतून फक्त 6 तासांत आता बंगळुरू गाठता येणार आहे. मुंबई आणि बंगळुरु दरम्यान ग्रीन एक्स्प्रेस हायवे उभारण्याची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती.
सध्या मुंबईतुन बंगळुरुला जाण्यासाठी 18 ते 19 तास लागतात. तर, पुणे ते बंगळुरू हा प्रवास 15 - 16 तासांचा आहे. नवा द्रुतगती महामार्ग पूर्ण झाल्यास पुणे-बंगळुरू प्रवास फक्त 5 ते 6 तासांत होणार आहे. हा महामार्ग मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला जोडला जाणार आहे. यामुळे मुंबईहून बंगळुरूला फक्त 6 तासांत पोहचता येणार आहे.
भारतमाला प्रकल्पांतर्गत पुणे ते बंगळुरू दरम्यान सुमारे 700 किमी लांबीचा ग्रीन एक्स्प्रेस हायवे उभारला जात आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याच्या रिंग रोडपासून एक वळण लागेल आणि तिथून हा हायवे सुरू होणार आहे.
नुकतेच पुणे-बगळुरू महामार्गाच्या महाराष्ट्र विभागाला पर्यावरण खात्याची मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाला लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाकडून अंतिम मंजुरी मिळेल. 2028 पर्यंत हा हायवे सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
आयटी हब असलेल्या पुणे आणि बंगळुरू या दोन शहरांमधील संपर्क वाढवण्याच्या उद्देशाने बेंगळुरू-पुणे द्रुतगती महामार्ग बांधला जात आहे. या सुपफास्ट हायवेच्या निर्मितीमुळे दोन्ही शहरांमधील अंतर सुमारे 95 किमीने कमी होणार आहे.
नवा द्रुतगती महामार्ग अॅक्सेस-कंट्रोल ग्रीनफिल्ड स्वरुपाचा असणार आहे. या द्रुतगती मार्गावर 2 आपत्कालीन हवाई पट्टी आणि 22 इंटरचेंज असणार आहेत. यावर फक्त हायस्पीड वाहनांना परवानगी असेल. या एक्स्प्रेस वेवर वाहन ताशी 120 किमी वेगाने वाहने धावणार आहेत.
बंगळुरू-पुणे द्रुतगती महामार्ग महाराष्ट्र आणि कर्नाटकातील एकूण 12 जिल्ह्यातून जाणार आहे. महाराष्ट्रातील 3 आणि कर्नाटकातील 9 जिल्हे एकमेकांना जोडले जाणार आहेत. महाराष्ट्रात हा मार्ग पुणे रिंगरोडवरील कांजळे येथून सुरू होऊन पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यातून जाणार आहे.
कर्नाटकात, बेळगाव, बागलकोट, गदग, कोप्पल, विजयनगर, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमकूर आणि बंगळुरू ग्रामीण या जिल्ह्यांतून हा महामार्ग बंगळुरु शहरात संपणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) देखरेखीखाली हा द्रुतगती मार्ग बांधला जाणार आहे. हा महामार्ग 8 लेनचा असणार आहे.
हेही वाचा