रविवारी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १३८४ घरांसाठी लाॅटरी पार पडली. या लाॅटरीमधून केवळ १३८४ अर्जदरांचं घराचं स्वप्न पूर्ण झालं. तर १ लाख ६३ हजार अर्जदारांच्या पदरी निराशा पडली. पण अर्जदारांनो निराश होण्याची गरज नाही. कारण पुन्हा एकदा लाॅटरीत सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे आणि ती देखील येत्या ६-७ महिन्यांत.
मुंबई मंडळानं जून-जुलैमध्ये २०१९ ची लाॅटरी काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. मुंबईच्या घरांची वाढती मागणी लक्षात घेता घरांचा आकडा फुगवत किमान २००० घरांचं टार्गेट मुंबई मंडळानं ठेवलं आहे. त्यानुसार मुंबई मंडळातील प्रत्येक विभागाला आता घर शोधण्याचं टार्गेट दिलं असून आता घरांची शोधाशोध सुरू होणार आहे. त्यामुळं किमान २००० घरांसाठी जून-जुलैमध्ये सोडत काढण्यात येणार आहे.
मुंबई मंडाळाच्या ज्वाॅईंट व्हेंचर प्रकल्पामधून तसंच प्रीमियमच्या रूपानं दुरूस्ती मंडळाला मिळालेल्या घरांमधून मिळणाऱ्या घरांची ही लाॅटरी असण्याची शक्यता आहे. तर विखुरलेल्या जुन्या घरांचा शोध घेत त्या घरांचाही २०१९ च्या लाॅटरीत समावेश होण्याची शक्यता आहे. दरम्यान आताच लाॅटरी पार पडल्यानं पुढची लाॅटरी नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच होईल, असा अंदाज व्यक्त होत होता. पण २०१९ ची लाॅटरी ही पुढच्या ५-६ महिन्यांतच पार पडणार आहे. याचं मुख्य कारण म्हणजे आगामी विधानसभा निवडणुका.
लाॅटरीची प्रक्रिया ही म्हाडाची दैनंदिन प्रक्रिया असल्यानं आचारसंहिता लागली तरी त्याचा परिणाम लाॅटरीवर होत नाही. मात्र २०१४ मध्ये लाॅटरी प्रक्रियेवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला होता. नंतर या लाॅटरीला परवानगी मिळाली असली, तरी उगाच काही अडथळा येऊ नये म्हणून मुंबई मंडळ आचारसंहिता लागू होण्याआधीच लाॅटरी काढण्याचा प्रयत्न करणार आहे. तसंच या काळात म्हाडाचे अधिकारी-कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असतात. त्यामुळे मुंबई मंडळाचा जून-जुलैचा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न असणार आहे.
हेही वाचा-
EXCLUSIVE: कल्याण खोणी-शिरढोणमधील ५ हजार घरांसाठी जानेवारीत जाहिरात
नशीब असावं तर असं... एकाच घरातील तीन जणांना लाॅटरी