मुंबई - मुंबईतील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि मुंबईकरांना आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो प्रकल्प हाती घेतला. त्यानुसार वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो अडीच वर्षांपूर्वीच मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. मेट्रोद्वारे सुफरफास्ट आणि गारेगार प्रवास करता येत असल्याने आता एमएमआरडीएने मुंबईतच नव्हे तर मुंबई महानगर प्रदेशातही मेट्रोचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या काही वर्षात मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात तब्बल 172 किमीच्या मेट्रो मार्गाचे काम करण्यात येणार आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)कडून सुरू असलेल्या भुयारी कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-3 मार्गाचा यात समावेश आहे. तर एमएमआरडीएकडून दहिसर ते अंधेरी मेट्रो-7 सह दहिसर ते डी.एन.नगर मेट्रो मार्गाचाही यात समावेश आहे. एमएमआरमध्ये वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो-4 च्या माध्यमातून मेट्रोचे जाळे विणण्यात येणार असून लवकरच या मार्गाच्या कामालाही सुरूवात होणार आहे.
डी.एन.नगर ते मानखुर्द मेट्रो-2-ब साठी निविदा मागवण्यात आल्या असून या मार्गालाही येत्या काही महिन्यांतच सुरूवात होणार आहे. असे असताना आता मुंबईकरांसह ठाणेकरांसाठी आणखी एक खुशखबर आहे. कारण मुंबईसह ठाण्यातील मेट्रो प्रकल्पात लवकरच आणखी दोन मेट्रो मार्गांची भर पडणार आहे. एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी पी.आर.के.मूर्ती यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिलेल्या माहितीनुसार लोखंडवाला ते कांजुरमार्ग मेट्रो-6 आणि ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-5 या दोन्ही मेट्रो मार्गांचा सविस्तर आराखडा मंजुरीसाठी महिन्याभरापूर्वीच सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला सरकारने सकारात्मकता दर्शवली असल्याने लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळेल असा विश्वासही मूर्ती यांनी व्यक्त केला आहे.
आणखी एक खुशखबर म्हणजे मुंबईतील एका आणि ठाण्यातील एका मेट्रोमार्गाचे विस्तारीकरणही करण्यात येत आहे. त्यानुसार दहिसरपर्यंत धावणारी प्रस्तावित मेट्रो यापुढे विस्तारीकरणाच्या माध्यमातून थेट मिरा-भाईंदरपर्यंत नेण्यात येणार आहे. तर वडाळ्यापासून कासारवडवलीपर्यंत धावणारी मेट्रो थेट घोडबंदरपर्यंत धावणार आहे. या विस्तारीकरणामुळे एमएमआरमधील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. एकूणच या सर्व मेट्रोमार्गांमुळे भविष्यात मुंबईकरांना आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार हे निश्चित. पण त्याचवेळी या प्रकल्पांमुळे पर्यावरणाला धोका पोहचत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून होत असून प्रकल्पांना जोरदार विरोध होत आहे. त्यामुळे हे प्रकल्प मार्गी लावताना पर्यावरणाला विशेषत: झाडांना धक्का लागणार नाही याची विशेष काळजी घेत हे प्रकल्प राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.