राज्य सरकारनं गेल्या महिन्यात म्हाडाला नियोजन प्राधिकरणा (स्पेशल प्लॅनिंग अॅथाॅरीटी)चा दर्जा दिला आहे. हा दर्जा मिळून एक महिनाही होत नाही, तोच म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकास प्रक्रियेच्या कामांनी वेग धरला आहे. म्हाडातील इमारत प्रस्ताव परवानगीकडे विविध परवानग्यांसाठी तब्बल ६० प्रस्ताव सादर झाल्याची माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे.
वर्षानुवर्षे रखडलेल्या म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास मार्गी लागल्यास या वसाहतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना तर दिलासा मिळणार आहेच, पण सोबतच परवडणाऱ्या अतिरिक्त घरांची संख्याही वाढणार असल्यानं नवीन गृहखरेदीदारांचाही फायदा होणार आहे.
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये म्हाडाच्या ५६ वसाहती असून या वसाहतींमध्ये ११४ अभिन्यास अर्थात लेआऊट आहेत. ११४ लेआऊटमधील इमारती धोकादायक असून या इमारतींचा शक्य तितक्या लवकर पुनर्विकास होणं गरजेचं आहे. मात्र तांत्रिक अडचणी आणि म्हाडाची सातत्यानं बदलत जाणारी पुनर्विकासासंबंधीची धोरणं यामुळं पुनर्विकास रखडत असल्याचं चित्र होतं. पण आता पुनर्विकासाचं धोरण अंतिम झालं असून नियोजन प्राधिकरणाचा दर्जा मिळाल्यानं पुनर्विकासासाठीच्या परवानग्या म्हाडाकडूनच मिळणार आहेत.
राज्य सरकारनं २३ मे रोजी म्हाडाला पंतप्रधान आवास योजना आणि म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला. यामुळे म्हाडाला विविध प्रकारच्या परवानग्यांसाठी महापालिकेवर विसंबून राहावं लागणार नसल्यानं प्रकल्पाचा वेळ वाचणार आहे.
नियोजन प्राधिकरणाचा दर्जा मिळाल्याबरोबर म्हाडानं म्हाडा वसाहत अभिन्यास मंजुरी कक्ष, बृहन्मुंबई क्षेत्र इमारत प्रस्ताव परवानगी कक्ष आणि पंतप्रधान आवास योजना कक्ष असे ३ स्वतंत्र कक्ष तयार केल आहेत. त्यानुसार इमारत परवानगी, सुधारित नकाशे मंजुरी, भोगवटा प्रमाणपत्र अशा कामांसाठी ६० प्रस्ताव स्वतंत्र कक्षाकडे आले आहेत.
बृहन्मुंबई क्षेत्र इमारत प्रस्ताव परवानगी कक्षानं नेहरू नगर, कुर्ला येथील त्रिमूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्थेला नुकतंच भोगवटा प्रमाणपत्र दिलं आहे. तर ६ इमारतींच्या विविध प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. उर्वरित प्रस्तावांचं काम प्रगतीपथावर असल्याचंही म्हाडाकडून सांगण्यात आलं आहे. सोसायट्यांकडून प्रस्ताव येत असल्यानं आता म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास वेग धरणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
म्हाडाकडून पहिल्यांदाच विविध प्रकारच्या परवानग्या देण्याचं काम होत असल्यानं हे काम सुलभ आणि सुरळीत व्हावं यासाठी मुंबई महापालिकेकतील अनुभवी अभियंत्यांची मदत घेतली जात असल्याचंही म्हाडानं स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा-
लाॅटरीच्या जाहिरातीला जून-जुलैचा मुहूर्त!
बीडीडी वरळीचा पुनर्विकास टाटाच्या हाती