Advertisement

शरीरसौष्ठव क्षेत्रात मराठमोळ्या सागरची 'गरुड झेप'

'रुबरू मिस्टर इंडिया' स्पर्धेत सहभागी झालेल्या ३० हजार तरूणांना मागे सारत मुंबईतील सागर आमले या तरूणानं अंतिम फेरीत मजल मारली.

शरीरसौष्ठव क्षेत्रात मराठमोळ्या सागरची 'गरुड झेप'
SHARES

शरीर कमावण्याची हौस अनेकांना असते. पण त्यात करीयर काहीजणच करतात. अर्थात बॉडीबिल्डींगमध्ये करीयर करणं तेवढं सोपं नक्कीच नाही. त्यासाठी विशिष्ट आहार घ्यावा लागतोच. शिवाय याला व्यायामाची जोडदेखील द्यावी लागतेच. एकूणच काय तर पिळदार शरीर मिळवण्यासाठी प्रचंड मेहनतीची आवश्यकता असते. आज आम्ही तुमची ओळख अशाच एका मराठमोळ्या तरूणाशी करून देणार आहोत ज्यानं 'रुबरू मिस्टर इंडिया' या स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपल्या नावाचा झेंडा फडकवला आहे.

'रुबरू मिस्टर इंडिया' स्पर्धेत सहभागी झालेल्या ३० हजार तरूणांना मागे सारत मुंबईतील सागर आमले या तरूणानं अंतिम फेरीत मजल मारली. बॉडीबिल्डींगपासून सुरुवात केल्यानंतर सागर मॅन्स फिजिक्सकडे वळला. मॅन्स फिजिक्सच्या क्षेत्रात पिळदार शरीरसृष्टी कमवल्यानंतर तो एक पायरी पुढे चढत रुबरू मिस्टर इंडियाच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे त्याचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नक्कीच नाही. बॉडीबिल्डींग ते रुबरू मिस्टर इंडियापर्यंतचा त्याचा हाच प्रवास जाणून घेऊयात सागर आमलेकडूनच.


'रुबरू मिस्टर इंडिया' पर्यंतच्या या प्रवासाबद्दल काय सांगशील?

'रुबरू मिस्टर इंडिया' स्पर्धेची अंतिम फेरी गाठणं हे माझ्यासाठी सोपं नव्हतंच. पण मेहनतीच्या बळावर मी अंतिम फेरीपर्यंत मजल मारल्याचा आनंदच आहे. खरं सागायचं तर मी सुरुवातीला शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायचो. त्यानंतर मला 'रुबरू मिस्टर इंडिया' स्पर्धेविषयी कळालं. फिटनेस चांगलं असल्यामुळे मी रुबरू मिस्टर इंडिया स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. पण शरीरसौष्ठव स्पर्धा आणि सौंदर्य स्पर्धा यांच्यात फार मोठा फरक आहे. त्यामुळे मला स्वत:वर प्रचंड मेहनत घ्यायची आवश्यकता होती. त्या हिशोबानं साधारण सात-आठ महिन्यापूर्वी तयारी सुरू केली. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फक्त पिळदार बॉडी आणि उत्तम फिटनेस असून चालत नाही. यासोबतच संवाद कौशल्य, सामान्य ज्ञान आणि सामाजिक जाणिव असणं देखील गरजेचं आहे. यासाठी मी प्रचंड मेहनत घेतोय.


'रुबरू मिस्टर इंडिया' स्पर्धेचं नेमकं स्वरूप कसं आहे?

संभाषण कौशल्य, हुशारी, सादरीकरण, शारीरिक तंदुरुस्ती आदी निकषांवर तुमची निवड केली जाते. प्राथमिक फेऱ्या आणि चाचण्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेल्यांची जेतेपदासाठी कसोटी लागते. स्पर्धेतील विजेत्यांना आगामी काळातील जागतिक स्तरावरील प्रमुख स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. याशिवाय 'रुबरू मिस्टर इंडिया' विजेत्यांना या उदात्त, सामाजिक कार्यामध्ये योगदान देण्याची संधी मिळते. तसंच १२ महिन्यांच्या काळात त्यांना विविध सामाजिक आणि फॅशन उपक्रमांमध्ये सहभागी होता येते. या स्पर्धेत सात-आठ फेऱ्या होतात. अंतिम फेरीमध्ये फॅशन विश्वातील मोठे-मोठे डिझायनर्स देखील तिथे उपस्थित असतात. त्यांनी डिझाईन केलेले पेहराव परिधान करण्याची संधी तुम्हाला मिळते. याशिवाय नामवंत फोटोग्राफर्सकडून तुमचे फोटो क्लिक केले जातात. यावर्षी २७ एप्रिल ते १ मे असे चार दिवस ही स्पर्धा रंगणार आहे.


'रुबरू मिस्टर इंडिया' स्पर्धेसाठी तू कशा प्रकारची तयारी करत आहेस?

बॉडीबिल्डींग करा किंवा मॉडेलिंग, पहिलं तुमचं फिटनेस पाहिलं जातं. फिटनेसवरून तुमचं पहिलं परिक्षण केलं जाणार. त्यामुळे फिटनेसवर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. मी दिवसातून दोन वेळा म्हणजेच सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा जिमला जातो. सर्वात महत्त्वाचं मी माझं काम करून आपली आवड जपतोय. मी वेडिंग प्लॅनिंग कंपनीत फ्लॉवर डेकॉर एक्सपर्ट म्हणून  काम करतो. त्यानुसार मी माझं रोजचं टाईमटेबल बनवलं आहे.  याशिवाय 'रुबरू मिस्टर इंडिया' स्पर्धेत एक टॅलेंट फेरी असते. या फेरीत मी नृत्य सादर करणार आहे. यासाठी मी नृत्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहे. 


आहार आणि व्यायाम यात कसं संतुलन राखतोस ?

जिमसोबतच आहार देखील महत्त्वाचा आहे. त्यामुळे २० टक्के जिम आणि ८० टक्के आहार असा समतोल मी राखला आहे. जिममध्ये घाम गाळत असलो तरी काहीही खाल्लं तर चालेल, हा गैरसमज आहे. तोंडावर तुमचं नियंत्रण नसेल तर कितीही जिम केली तरी सर्व निरर्थक आहे. मी प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन अधिक करतो. एकाच वेळी मी कार्ब घेतो आणि बाकी वेळी प्रोटीन्स. सलाड यासोबतच चिकन, फिश, अंडी या मांसाहारी पदार्थांचा देखील आहारात समावेश करतो. त्यासोबत काही आवश्यक डाइटरी सप्लिमेंट्सही मी घेतो.


तुझा फिटनेस फंडा काय आहे?

मी दिवसातून दोन वेळा व्यायाम करतो. शिवाजी पार्क इथल्या ‘रिजस दी फिटनेस फॅक्टरी’ या जिममध्ये मी जातो. शरीरसौष्ठव करणाऱ्या तरुणांना माझी व्यायामशाळा खूप प्रोत्साहन देते. माझे फिटनेस गुरू मनिष आडविलकर यांच्यामुळेच मी आज या स्टेजवर पोहोचलो आहे. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात जा पण यशस्वी होण्यासाठी जिद्द आणि मेहनत हवीच.


बॉडी बिल्डींगकडून तू मेन्स फिजिककडे वळला आहेस. दोन्ही प्रकारात नेमका फरक काय?

शरीरसौष्ठव हा एक क्रीडा प्रकार आहे. यात मुख्यत्वे शरीराला व्यायाम देउन शरीराच्या स्नायूंना बळकट केले जाते. स्नायूंचा आकार आणि त्यांची सुडौलता, प्रमाणबद्धता, त्याचे सादरीकरण हे या क्रिडाप्रकारात महत्त्वाचे असते. मेन्स फिजिकमध्ये तुम्हाला मॉडेलसारखी बॉडी लागते.


भविष्यात तुझा काय प्लॅन आहे?

'रुबरू मिस्टर इंडिया' स्पर्धेमुळे एक व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. स्पर्धेच्या विजेत्याला अनेक जाहिरातींमध्ये काम करण्याची, मॉडेलिंग क्षेत्रात चांगल्या संधी मिळतात. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळेल. त्यामुळे मी ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. मेहनत घेतली तरच स्वप्नांची पूर्तता होते.

२७ एप्रिलला 'रुबरू मिस्टर इंडिया'ची अंतिम फेरी रंगणार आहे. त्यामुळे त्याची प्रचंड मेहनत तर सुरूच आहे. मेहनत आणि जिद्दीच्या बळावर तो नक्कीच यश संपादन करेल, अशीच आशा आहे. मुंबई लाइव्हकडून सागरला शुभेच्छा...



हेही वाचा

पुश-अप्स मारताना करू नका या ९ चुका

'हे' ७ व्यायाम प्रकार तुमचं आयुष्य करतील सुखकर




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा