प्रतापगड पायथ्याजवळील (Satara Pratapgad) अफजलखान कबर (Afzal Khan) जवळील अतिक्रमण हटवल्यानंतर राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी आता अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारा देखावा असणारा छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या संबंधिती घोषणा केली आहे.
राज्य सरकारने शिवप्रतापदिनाचे औचित्य साधत प्रतापगडावरील अफजलखानच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडलं. 10 नोव्हेंबर रोजी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाचा वध करण्यात आला होता आणि याच दिवशी अनाधिकृत बांधकाम पाडण्यात आली.
शिवभक्तांच्या मागणीला लक्षात घेऊन, किल्ले प्रतापगड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यावर चाल करुन आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाईट व साउंड शो सुरु करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव मागविण्यात आला आहे!#shivpratap #छत्रपतीशिवाजीमहाराज #प्रतापगड pic.twitter.com/SyR0v23av3
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) November 15, 2022
राज्य सरकारच्या या निर्णयानंतर सर्व स्तरातून आनंद व्यक्त करण्यात आला. त्यानंतर आता राज्य सरकारने त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार असल्याची घोषणा केली.
अफझलखानाच्या वधाला यंदा 350 वर्षे पूर्ण झाली आहेत. अफजलखानाच्या कबरीजवळ ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं आहे त्या ठिकाणी आता अफजलखानाचा कोथळा बाहेर काढत असणारा देखावा असलेला शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे.
याचसोबत या ठिकाणी लाईट आणि साऊंड शो सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता आहे.