आजवर मराठा समाजासाठी सरकारनं अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामुळं यापुढंही सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कटीबद्ध राहिलं, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा क्रांती मोर्चाला शांतता राखण्याचं आवाहन केलं. मागण्यांसाठी आंदोलकांनी हिंसेचा मार्ग अवलंबू नये, राज्य सरकार आंदोलकांशी कधीही चर्चा करण्यास तयार आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी एका निवेदनाद्वारे आंदोलकांना चर्चेचं निमंत्रण दिलं.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मुंबईसह महाराष्ट्र पेटला असून मुंबई बंदला ठाणे आणि नवी मुंबईत हिंसक वळण लागलं आहे. मराठा क्रांती मोर्चानं बंद स्थगित केल्यानंतरही नवी मुंबईत उद्रेक सुरूच राहिला. तरीही मुख्यमंत्री गप्प आहेत, सरकारकडून कुणीही पुढं येत नसल्याची टीका काही वेळापूर्वीच काँग्रेसकडून करण्यात आली. या टीकेनंतर, बंदला स्थगिती दिल्यानंतर आणि कंळबोलीतील परिस्थिती गंभीर झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्र्यांनी एक निवेदन जारी करत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
या निवेदनानुसार सरकारनं आरक्षणाच्यादृष्टीनं अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत त्यासंबंधी कायदाही केला. पण उच्च न्यायालयानं कायद्याला स्थगिती दिली. त्यानंतर राज्य सरकार ही स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं. पण सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली नाही. त्यामुळं आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे.
न्यायालयीन प्रक्रियेद्वारे आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यात आला आहे. या आयोगामार्फत नक्कीच संवैधानिक कक्षेत राहून आरक्षणाचा मुद्दा निकाला काढण्यासाठी प्रस्ताव तयार केला जाईल. सरकारच्या अखत्यारित ज्या काही बाबी आहेत त्या करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी या निवेदनात म्हटलं आहे. आतापर्यंत सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी घेतलेल्या निर्णयांचा लेखाजोखाही या निवेदनात मांडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून होणारी आंदोलन, आत्महत्या, आत्महत्येचे प्रयत्न या बाबी दु:खद असल्याचं सांगतानाच काही राजकीय नेते या परिस्थिताचा फायदा घेत परिस्थिती चिघळवत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तर मराठा क्रांती मोर्चाला शांततेचं आवाहन करत चर्चेसाठी निमंत्रण दिलं आहे. आता यावर मराठा क्रांती मोर्चा काय भूमिका घेते हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरेल.
हेही वाचा-
मराठा आरक्षणावर विशेष अधिवेशन बोलवा- अशोक चव्हाण
Live Updates - मराठा क्रांती मोर्चा: मुंबई, ठाण्यातील वाहतूक विस्कळीत