गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरोधात वातावरण तापलेलं असताना महाराष्ट्रत ही आता उत्तर भारतीयांविरोधातील वाद चिघळण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी या वादाला हवा दिली आहे.
उत्तर भारतीय मुंबई आणि राज्य चालवतात त्यांनी जर एक दिवस काम बंद केलं तर मुंबई बंद पडेल या निरुपम यांच्या वादग्रस्त विधनाचं आता चांगलंच पडसाद उमटू लागले आहेत. काँग्रेसच्या भैय्यानं मुंबई बंद करून दाखवावीच असं म्हणत मनसेचे संदीप देशपांडे यांनी निरुपम यांना आव्हान दिलं आहे.
नागपूरमध्ये उत्तर भारतीयांच्या एका सभेत हे वादग्रस्त विधान केलं आहे.
महाराष्ट्र आणि मुंबई हे उत्तर भारतीय चालवतात. त्यानी जर एक दिवस कामबंद केलं तर मुंबई बंद पडेल. रिक्षा-टॅक्सीचं काय तर साधी भाजीही मिळणार नाही, असं ते यावेळी म्हणाले. निरुपम यांच्या या वक्तव्याचा खरपुस समाचार मनसेनं घेतला आहे. मुंबई बंद पडण्याची हिंमत असेल तर या काँग्रेसच्या भैयाने मुंबई बंद करून दाखवण्याची हिंमतच करावी, असं देशपांडे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं आहे.
दरम्यान निरुपम यांच्या वादग्रस्त विधानावरून मनसेने सोशल मीडियावरही जोरदार पोस्टरबाजी केली आहे. या पोस्टरमध्ये संजय निरुपम यांना परप्रांतीय भटका कुत्रा असं म्हणण्यात आलं असून परप्रांतीय मतावर त्यांचा डोळा असल्याचं म्हटलं आहे.
देशपांडे यांनी निरुपम यांना आव्हान दिलं असतानाच मनसेच्या अखिल चित्रे यांनी निरुपम यांना परप्रतिय भटका कुत्रा असं म्हटलं आहे. परप्रांतीय मतांसाठी निरुपम काहीही बोलत आहे, समाजात तेढ निर्माण करत आहे असं म्हणत चित्रे यांनी निरुपम यांना आता कुणीतरी आवरण्याची गरज आहे, असंही म्हटलं आहे. यासंबंधीचं चित्रे यांच पोस्टर सोशल मीडियावर सध्या चांगलंच व्हायरल होत आहे.