Advertisement

तर मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढेल, देवेंद्र फडणवीसांनी दिला महापालिकेला धोक्याचा इशारा

कोरोनाग्रस्तांची संख्या कृत्रिमपणे कमी करण्याचा असा प्रयत्न लाखो लोकांच्या जीवासाठी घातक ठरू शकतो, अशा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेला दिला आहे.

तर मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढेल, देवेंद्र फडणवीसांनी दिला महापालिकेला धोक्याचा इशारा
SHARES

मुंबई महापालिकेने अतिजोखमीच्या (high risk patient) संपर्काची तपासणी करण्याची गरज नाही असा आदेश काढला आहे. तसं केल्यास भलेही मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या कृत्रिमरित्या कमी दिसणार असली, तरी यातून शहरात कोरोनाचा संसर्ग (coronavirus) मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. या धोक्याकडे लक्ष वेधत महापालिकेने (bmc) इंडियन काऊंन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चच्या दिशानिर्देशांचं पालन करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारं पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना पाठवलं आहे. 

काय म्हटलं आहे पत्रात?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आपल्या पत्रात लिहितात की, इंडियन काऊंन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) वतीने वेळोवेळी दिशानिर्देश जारी केले जात आहेत. आतापर्यत असे ४ दिशानिर्देश जारी झाले आहेत. त्यातील ९ एप्रिल २०२० च्या आदेशातील मुद्दा क्रमांक ५ मध्ये (Asymptomatic direct and high risk contact of a confirm case should be tasted once between day 5 and day 14 of coming in his/her contact ) ज्या अतिजोखीम रोगाची लक्षणं नाहीत, परंतु तो कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आला आहे. अशांची तो/ती संपर्कात येण्याच्या पाचव्या दिवसापासून ते १४ दिवसांपर्यंत एकदा तपासणी करावी. 

Advertisement

हेही वाचा- वांद्र्यातील घटनेमागचा सूत्रधार शोधा, विनोद तावडेंची मागणी

महापालिकेचा आदेश काय?

हा स्वयंस्पष्ट आदेश असताना मुंबई महापालिकेने १२ एप्रिल २०२० रोजी एक आदेश काढला आणि त्यात (no testing for asymptomatic however they need to be quarantine) अशा अतिजोखमीच्या (हायरिस्क) संपर्काची तपासणी करण्याची गरज नाही असं सांगण्यात आलं आहे. 

खरं तर आयसीएमआरचेच आदेश राष्ट्रीय पातळीवर सारे पाळत असल्याने त्यात बदल करण्याची काहीच गरज नव्हती. त्यामुळे मुंबई महापालिकेने १२ एप्रिलचा आदेश काढण्याची काही गरज नव्हती. हा आदेश आल्यानंतर त्यावर विविध माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर पुन्हा एक आदेश १५ एप्रिल २०२० रोजी काढण्यात आला. या आदेशामुळे तर प्रचंड गोंधळ निर्माण झाला. 

Advertisement

वाक्य बदललं अर्थ तोच

यातील मुद्दा क्रमांक डी १ म्हणतो की, (no testing for asymptomatic however they need to be quarantine) अतिजोखमीच्या (हायरिस्क) संपर्काची तपासणी करण्याची गरज नाही. मुद्दा क्रमांक डी ४ म्हणतो की, (high risk contacts may be tasted on 5th day after careful observation so as to get testing effective) म्हणजे अशा अतिजोखमीच्या व्यक्तीची पाचव्या दिवशी निरीक्षण करून लक्षण दिसली तरच चाचणी करता येईल. चीनमध्ये कोरोनाच्या ४४ टक्के केसमध्ये लक्षणं नसलेल्या व्यक्तींकडूनच दुसऱ्यांना संसर्ग झालेला आहे. हे इथं आजर्वून नमूद करावसं वाटतं.

केवळ भाषा बदलली असली तरी यातून मुंबई महापालिकेच्या १२ एप्रिल २०२० च्याच आदेशाचा अर्थ कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अतिजोखमीच्या रोगाची लक्षणं नसलेल्या व्यक्तींची तपासणी होण्याची शक्यता दिसत नाही आणि ती केली नाही तर कुणाला जबाबदार देखील धरता येणार नाही. 

हेही वाचा- भाडेवसुली ३ महिने पुढं ढकला! घरमालकांसाठी शासनाने काढला 'हा' महत्त्वाचा आदेश

घातक निर्णय

यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईतील रुग्णांची आकडेवारी कमी दिसण्यास मदत होणार असली, तरी यामुळे काेरोनाचा प्रसार रोखण्यास कोणतीही मदत होणार नाही. जे व्यक्ती कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेले आहेत, त्यांच्या संपर्क आणि संसर्गातून नवीन कोरोनाग्रस्त तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेनेसुद्धा आयसीएमआरच्या धर्तीवर स्वयंस्पष्ट दिशानिर्देश जारी करावेत. 

कोरोनाग्रस्तांची संख्या कृत्रिमपणे कमी करण्याचा असा प्रयत्न लाखो लोकांच्या जीवासाठी घातक ठरू शकतो. मुंबई महापालिकेला आपली रणनिती बदलण्यासाठी आपण निर्देश द्यावेत ही नम्र विनंती, असं आवाहन या पत्रातून फडणवीस यांनी केलं आहे. 


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा