मुंबई - कुर्ला येथील किनारा हॉटेल गॅस सिलेंडर दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना दीड वर्षानंतर 1 लाखाची मदत जाहीर झाली आहे. मात्र ही मुदत पुरेशी नसल्याचे म्हणत वॉचडॉग फाऊंडेशनने नाराजी व्यक्त केली आहे. ज्या पालकांची तरुण मुलं जे त्यांचे म्हातारपणाचे आधार होते अशी मुलं गमावणाऱ्या पालकांना केवळ 1 लाखाची मदत कशी, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पुरेसा निधी नाही का असा सवाल करत वॉचडॉगने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 800 रुपये मदत म्हणून दिले आहेत.
वॉचडॉग फाऊंडेशनचे निकोलस डीमेंटो यांनी 100 रुपयांचे 8 असे 800 रुपयांचे डिमांड ड्राफ्ट मुख्यमंत्री सहायता निधीला बुधवारी पाठवले आहेत. तर मृतांच्या आठही पालकांना किमान 50 लाखांची मदत मिळावी अशी मागणीही डीमेंटो यांनी केली आहे.
दोन अधिकारी दोषी
या दुर्घटनेचा तपास संथ गतीने सुरू आहे. त्यातही तपास योग्य प्रकारे सुरू नसल्याचा आरोप आता मृतांच्या पालकांकडून होतेय. दरम्यान दीड वर्षाच्या तपासात केवळ दोनच पालिका आधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. तर या दोषींविरोधात अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही. इतर दोषींचे काय असा प्रश्नही डीमेंटो यांनी विचारला आहे.