हिवाळी अधिवेशनाच्या सलग चौथ्या दिवशी महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप, शिंदे गटाचे नेते विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमनेसामने आले. नागपूर भूखंड घोटाळ्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. तर, अभिनेता सुशांतसिह राजपूत तसेच दिशा सालियन आत्महत्या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले आहे.
दिशा सालियन हिच्या मृत्यूच्या वेळी तेथे एक तत्कालीन मंत्री उपस्थित होते. तेथील सीसीटिव्ही फुटेजमध्ये त्या मंत्र्यांची छायाचित्र होती. मात्र ती पुसून टाकण्यात आली आहेत, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी विधानसभेत केला. या वेळी झालेल्या गोंधळामुळे तालिका सभापती संजय शिरसाट यांनी ५ वेळा सभागृहाचे कामकाज स्थगित केले.
त्यानंतर या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच, सीबीआयने दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास केला नाही. केवळ सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास केला आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.
आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिशा सालियन हिने आत्महत्या केली की तिला इमारतीवरून फेकून देण्यात आले? याची चौकशी व्हावी. तिने सुशांत राजपूत याच्याशी मोबाईलवरून केलेले संभाषणाची माहिती उघड करण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच, दिशा सालियन हिच्या मृत्यूचा सखोल तपास करून सत्य जनतेपुढे मांडावे, असे आवाहन त्यांनी केले.
दिशा सालियन हिचा शवविच्छेदन अहवाल अद्याप मुंबई पोलिसांना प्राप्त झालेला नाही. सीसीटिव्ही फुटेजमधून नेमके काय डिलिट करण्यात आले, हे कळायला हवे. या प्रकरणातील चौकशी अधिकारी २ वेळा बदलण्यात आला.
अभिनेता सुशांत राजपूत यांनी मोबाईलवरून दिशा सालियन हिला काही माहिती पाठवली होती. त्यामुळे तिची हत्या करण्यात आली का? याविषयी पूर्नतपास करून या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण करण्यात यावे. मुंबई पोलिसांवर कुणाचा दबाव होता? कोणत्या ताकदीचा माणूस तेथे होता की, त्यामुळे त्याला वाचवले जात आहे? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नीतेश राणे यांनी केली.
हेही वाचा