माझी हत्या झाली तरी चालेल, पण मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ कधीच सोडणार नाही, अशी खळबळजनक पोस्ट अंबरनाथचे आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी केली आहे. डॉ.बालाजी किणीकर यांनी लिहिलेली ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून डॉ. बालाजी किणीकर हे एकमेव शिवसेनेचे आमदार आहेत. डॉ.किणीकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉ.श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. सोमवारी रात्री त्यांनी फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट केली.
अंबरनाथमधील काही लोक पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात तसेच अंबरनाथमधील विकासकामांच्या विरोधात काम करत आहेत. मात्र माझी हत्या झाली तरी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार नाही, तसेच अंबरनाथ शहराचा सर्वांगीण विकास कधीच थांबू देणार नाही, असे डॉ.किणीकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सर्वच पक्षांचे लोक विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. नुकतेच शिवसेनेच्या वतीने राज्यातील शंभरहून अधिक मतदारसंघात निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अंबरनाथचे आमदार डॉ.बालाजी किणीकर यांच्या या पदामुळे विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चर्चेला उधाण आले आहे.
काही महिन्यांपूर्वी आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी व्हॉट्सॲपवर असेच स्टेटस टाकले होते. मला मारले तरी चालेल, असेही नमूद केले होते.
हेही वाचा