मुंबई - महापालिका निवडणुकीत यंदा 11 माजी नगरसेवकांच्या मुलांचे लॉन्चिंग जोरात झाले आहे. आता आई- वडिलांनंतर मुलं महापालिकेत प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत. त्यामुळे आता महापालिकेच्या कारभाराचे धडे घरीच वडिलांकडून मिळणार असल्याने हे सर्व नगरसेवक घरुनच अभ्यास करून येणार आहेत.
महापालिकेच्या या निवडणुकीत माजी नगरसेवक प्रकाश कारकर, चंद्रकांत वाडकर, विद्या ठाकूर, सुधा टेंबवलकर, रामचंद्र पिल्ले, अशोक जाधव, रफीक शेख, नियाज वणु, सुरेश गंभीर, सदा सरवणकर, ज्ञानराज निकम यांची मुले निवडून आली आहेत. यापैकी ज्ञानराज निकम हे विद्यमान नगरसेवक असले तरी ८ मार्चनंतर ते माजी नगरसेवक होणार आहेत. विनोद घोसाळकर आणि नार्वेकर यांच्या सूनबाई नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. तर माजी नगरसेवक सुधीर मोरे यांची वहिनी स्नेहल आणि विद्यमान नगरसेवक गणेश सानप यांची वहिनी सुजाता सानप याही नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. विद्यमान महापालिकेत माजी नगरसेवक विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक आणि रमेशसिंह ठाकूर यांचे पुत्र सागरसिंह ठाकूर हे नगरसेवक म्हणून निवडून आलेले असून त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली आहे.
माजी नगरसेवक | नवनिर्वाचित नगरसेवक | पक्ष | प्रभाग |
प्रकाश कारकर | हर्षल | शिवसेना | ०६ |
चंद्रकांत वाडकर | सुहास | शिवसेना | ४० |
विद्या ठाकूर | दीपक | भाजपा | ५० |
टेम्बवलकर | स्वप्नील | शिवसेना | ५१ |
रामचंद्र पिल्ले | श्रीकला | भाजपा | ५७ |
अशोकभाऊ जाधव | अल्पा | काँग्रेस | ६५ |
नुरजहाँ रफीक शेख | आयेशा | सपा | १३७ |
नियाज वणू | सुफियान | काँग्रेस | १७९ |
सुरेश गंभीर | शीतल | भाजपा | १९० |
सदा सरवणकर | समाधान | शिवसेना | १९४ |
ज्ञानराज निकम | निकिता | काँग्रेस | २२३ |