लोकसभा निवडणुकीसाठी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघतून किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला शिवसैनिक विरोध करत आहेत. असं असताना पुन्हा एकदा शिवसेना-भाजपा युतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. त्याचं कारण म्हणजे, उत्तर मध्य मुंबईमध्ये निवडणूक प्रचारासाठी छापण्यात आलेल्या पोस्टर्सवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो वगळण्यात आला आहे. त्यामुळं युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत पूनम महाजन यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
या प्रकरणी जोपर्यंत पूनम महाजन चूक मान्य करत नाहीत तोपर्यंत त्यांच्या प्रचारावर बहिष्कार घालण्याचा निर्णय युवासेनेने घेतला. लोकसभा निवडणूक अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपलेली असताना कार्यकर्त्यांना नाराज करणं कुठल्याही उमेदवाराला परवडणारं नाही. त्यामुळे युवासेनेच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा महायुतीच्या उमेदवार खासदार पूनम महाजन यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना - भाजपा महायुतीच्या उमेदवार खासदार @poonam_mahajan ताई यांनी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे आणि युवासेनाप्रमुख @AUThackeray यांची मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. pic.twitter.com/GObwVXKDGY
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) 31 March 2019
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात पूनम महाजन यांनी महायुतीच्या नेत्यांचे जे बॅनर लावले होते, त्यात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो नव्हता. त्यामुळं युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी वांद्रे येथील शिवसेना शाखेत पूनम महाजन यांचा निषेध करणारी बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये युवासेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे हे युथ आयकॉन आहेत, युवकांचे आशास्थान आहेत, त्यांचा अपमान हा आम्हा शिवसैनिकांचा अपमान आहे. तसंच जोपर्यंत पूनम महाजन आपली चूक मान्य करत नाहीत, तोपर्यंत भाजपाच्या प्रचारावर बहिष्कार टाकण्याची भूमिका युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती.
हेही वाचा -
वांद्रे स्थानकात उंदीर आढळलेला स्टॉल बंद