Advertisement

राज्यात सिनेमागृह सुरू होण्याचे संकेत, मुख्यमंत्री म्हणाले…

एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढील कालावधीत सिनेमागृह सुरू करण्याविषयी संकेत दिले.

राज्यात सिनेमागृह सुरू होण्याचे संकेत, मुख्यमंत्री म्हणाले…
SHARES

राज्यातील सिनेमागृहे सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन याबाबत एसओपी (आदर्श कार्यपद्धती) तयार केल्या आहेत. या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढील कालावधीत सिनेमागृह सुरू करण्याविषयी संकेत दिले. (maharashtra cm uddhav thackeray assures to reopen film theatre and multiplex after sop)

कोविड – १९ मुळे राज्यातील सिनेमागृहे गेल्या ६ महिन्यांहून अधिक काळ बंद आहेत. याअनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मल्टिप्लेक्स, सिनेमागृहे मालकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सिनेमागृहे लवकरच सुरू करण्याबाबत आश्वस्त केलं.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील कोविड – १९ चं संकट मोठं असून या संकटकाळात सिनमागृहांचे मालक शासनासोबत आहेत याचं समाधान आहे. सिनेमा चालण्यासाठी सिनेमागृहांची आवश्यकता असते हे जरी खरं असलं तरी महाराष्ट्राने पुनश्च: हरिओम करीत कामगारांना काम मिळावं यासाठी उद्योग क्षेत्र सुरु केले. त्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरु करण्याबाबत नुकतीच परवानगी देण्यात आली. आता मेट्रो सेवा सुरु करण्यात आली आहे. रेल्वेमध्ये गर्दी होऊ नये यासाठी लोकलच्या फेऱ्याही वाढविण्यात आल्या आहेत. राज्यातील सिनेमागृहांबाबतही सकारात्मकता ठेवून निश्चित करण्यात आलेल्या एसओपीनुसार सिनेमागृहे सुरु करण्यात येतील. आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते ते आपण एकेक सुरू करत आहोत. मनोरंजन क्षेत्र हे राज्याच्या अर्थचक्राला गती देणारं क्षेत्र आहे. हे क्षेत्र बंद ठेवण्यात आपल्याला किंवा शासनाला आनंद नाही.

हेही वाचा- बाॅलिवूडला संपवण्याचे प्रकार सहन करणार नाही- उद्धव ठाकरे

आपल्याला जगभरात काही देशांमध्ये कोविड – १९ चा संसर्ग वाढल्याने युरोप, ऑस्ट्रेलिया, स्वीडन यासारख्या ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करावा लागला. हिवाळ्यात कोविड- १९ चा प्रादुर्भाव वाढू शकतो, असा इशारा देण्यात आल्याने आपल्याला काळजीपूर्वक पुढं जायचं आहे. महाराष्ट्रात आपण अनलॉक टप्प्याटप्प्याने करण्यामागे महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये हाच उद्देश आहे. सिनेमागृहांमध्ये वातानुकुलित वातावरणात प्रेक्षक सिनेमा पहायला आल्यानंतर किमान २ तास बंदिस्त ठिकाणी असतो. त्यावेळी त्याला संसर्ग होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. 

सिनेमागृहांमधील स्वच्छता पाळली जाणं, सिनेमागृहे वेळोवेळी सॅनिटाईज करणं, सिनेमागृहात एकूण आसनक्षमतेच्या फक्त ५० टक्के प्रेक्षक असणे याबाबी पाळल्या जाणं गरजेचं आहे.  एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, प्रेक्षकांनी मास्क लावणे, सॅनिटाईज करणे आणि शारीरिक अंतर पाळणे हे गरजेचं असल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

आताचा काळ सिनेमागृहे सुरु करण्यासाठी महत्त्वाचा

दसरा, दिवाळी, नाताळ असे लागोपाठ येणारे सण यामुळे या काळात अनेक सिनेमे प्रदर्शित होत असतात. लॉकडाऊन कालावधीत नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सिनेमागृहे बंद करण्यात आली होती. आता सिनेमागृहे सुरु केल्यानंतर पुन्हा एकदा प्रेक्षक सिनेमागृहात सिनेमा पाहण्यासाठी येतील, त्यामुळे आताचा काळ हा महत्त्वाचा आहे. परंतु सिनेमागृहे सुरु करण्याची परवानगी दिल्यानंतरही सिनेमागृहांमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांच्या सुरक्षेची आणि स्वच्छतेची काळजी यालाच प्राधान्य असणार आहे. सिनेमागृहे सुरु झाल्यामुळे या क्षेत्राला गती मिळणार आहे.,असं सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख म्हणाले.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा