छत्रपती शिवाजी महाराजांना इंगित विद्याशास्त्र अवगत होतं. अशीच भाषा मी देखील शिकणार आहे, जेणेकरून अजितदादांनी गाॅगल लावू द्या किंवा मास्क लावू द्या, त्यांच्या मनातलं बरोबर ओळखता येईल, असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चिमटा काढला.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर शिवजन्माचा सोहळा आयोजित करण्यात आला हाेता. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनोगत व्यक्त करताना उपस्थितांना पोट धरून हसवलं.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, शिवराय हे आपलं दैवत आहे. पूर्वीसुद्धा कित्येकांनी राज्यं जिंकली, स्थापन केली, कित्येक राज्यं विलयाला गेली. पण शिवरायांचं वेगळेपण आहे. लढण्यासाठी तलवार आवश्यक असते. पण तलवार घेऊन लढता येतंच असं नाही. तर ती पकडण्यासाठी जी जिद्द लागते, प्रेरणा लागते, ईर्ष्या लागते ती शिवरायांनी दिली.
हेही वाचा- राज्यपालांकडून शिवरायांना अभिवादन, शिवाजी पार्क जिमखान्यालाही भेट
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर शिवजन्माचा सोहळा pic.twitter.com/dXykCoOjYj
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 19, 2021
आता इतकी वर्ष झाली, शेकडो वर्ष झाली, वर्ष मोजण्यात काही अर्थ नाही, पुढची हजारो वर्ष होतील तरी तेच आमचं दैवत आहे आणि तेच दैवत राहणार. आपल्या या दैवताला वंदन करण्यासाठी आपण इथं आलोय. दोन्ही पुरस्कार प्राप्त शिवभक्तांचे अभिनंदन. त्यांचं कार्य वेगळं आहे.
आज शिवयोग हा नवीन शब्द समजला. शिवाय शिवसुमन या फुलाचं वैशिष्ट्य आज कळलं. ते आधी पाहिलं होतं पण ही माहिती आज कळली. किती सुंदर आहे. ते याच परिसरात पहिल्यांदा मिळालं हा खरंच शिवयोग. ज्यांनी ते शोधलं त्यांचं कौतुक वाटतं.
छत्रपती शिवाजी महाराजांना किती भाषा यायच्या याबद्दल बोलत असताना महाराजांना इंगित विद्याशास्त्र अवगत होतं असं म्हटलं जातं. ही भाषा दादांना येते. पण, आता मी ती भाषा शिकणार आहे. का? तर दादांच्या मनात काय चाललंय ते कळलं पाहिजे. भाषा शिकतो आणि मग दादांनी मास्क लावू द्या, गॉगल घालू द्या, तरीही ओळखून दाखवेन की, दादांच्या मनात काय चाललंय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना (ajit pawar) चिमटा काढला.
मी असेन, दादा असतील किंवा संभाजीराजे असतील, राजकारण बाजूला ठेवलं तर आपल्या सगळ्यांच्या मनातला शिवप्रेमाचा धागा महत्त्वाचा आहे. हे धागे एकत्र करून गोफ विणणं आवश्यक आहे. हा आपल्या राज्याच्या विकासाचा गोफ असणार आहे. आपल्या मनात शिवरायांचा इतिहास जिवंत आहे आणि राहणार. संपूर्ण जगात ते तेज पसरवायचं आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
(maharashtra cm uddhav thackeray pays respect to chhatrapati shivaji maharaj on shiv jayanti at shivneri fort)