लोकसभा निवडणूक तोंडावर आली असून भाजपा-शिवसेनेकडून अजूनही युतीचं गुर्ह्याळ सुरू असताना काँग्रेसनं मात्र यात बाजी मारली आहे. बुधवारी काँग्रेसनं मोठी राजकीय खेळी करत काँग्रेसच्या सरचिटणीसपदी प्रियांका गांधीची निवड करत भाजपासह इतर पक्षांची चिंता वाढवली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनं कंबर कसत महाराष्ट्राकडेही विशेष लक्ष देत महाराष्ट्रातील निवडणुकीसाठीच्या विविध समित्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे प्रचार समितीचं प्रमुखपद सोपवलं आहे. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे जाहीरनामा समितीच्या प्रमुख पदाची धुरा दिली आहे. एकूणच काँग्रेसकडून निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली असून काँग्रेस निवडणुकीच्या तयारीत आघाडीवर असल्याचं चित्र आहे.
उत्तर प्रदेशबरोबरच काँग्रेसकडून महाराष्ट्रालाही विशेष महत्त्व दिलं जात आहे. २०१४ च्या निवडणूका लक्षात घेता काँग्रेसचा राज्यात दारूण पराभव झाला होता. त्यावेळी केवळ २ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसनं आता मात्र महाराष्ट्राकडे आपलं लक्ष वेधत अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. तर निवडणुकीच्या तयारी वेग देण्याच्यादृष्टीनं अखेर निवडणुकीसाठीच्या विविध समित्याही जाहीर केल्या आहेत. सुशीलकुमार शिंदे यांची प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करतानाच राज्यातील इतर दिग्गज नेत्यांचाही समावेश समित्यांमध्ये करत समतोल साधला आहे.
काँग्रेसच्या निवडणूक समितीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची तर समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुमार केतकर यांच्याकडेही निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानुसार केतकरांना मीडिया समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी काँग्रेसनं दिली आहे. तसंच व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शरद रणपिसे यांनी वर्णी लावली आहे. गुरूवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या समित्यांची घोषणा केली आहे. समित्यांची घोषणा झाल्यानं आता राज्यात काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते निडणुकीच्या प्रत्यक्ष कामाला लागणार आहेत. त्यातच प्रियांका गांधी यांच्या राजकीय एण्ट्रीमुळे राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. त्यामुळे काँग्रेस नेते दुप्पट जोमानं कामाला लागतील अशी चर्चा आहे.
हेही वाचा -
प्रियांका गांधी सक्रिय! काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती
३३ हजार रुद्राक्षांनी साकारली बाळासाहेबांची प्रतिमा