Advertisement

तर उद्या ‘या’ शहरांच्या नामांतराचीही मागणी होईल- अजित पवार

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्यामुळे विकासाला आम्ही महत्त्व दिलं आहे. तीच भूमिका घेऊन सरकार पुढे चाललं आहे, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

तर उद्या ‘या’ शहरांच्या नामांतराचीही मागणी होईल- अजित पवार
SHARES

मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून औरंगाबद शहराचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी या वादावर भाष्य केलं आहे.

परस्पर झालेल्या या नामांतरावर प्रसारमाध्यमांनी अजित पवार यांना विचारलं असता, ते म्हणाले, बुधवारी रात्रीपासून औरंगाबदच्या नामांतराच्या विषयावर ऐकायला मिळत आहे. सकाळपासून मी जनता दरबार घेत असल्याने मला यातलं काहीच ठाऊक नाही. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार किमान समान कार्यक्रमावर चालत आहे. त्यामुळे मंत्रालयात गेल्यावर संबंधित पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बसून या विषयावर आम्ही चर्चा करू.

कोणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कोणी भावनिक मुद्दे काढतं, तर कोणी विकासाच्या मुद्द्यावर बोलतं, गेल्या ६० वर्षापासून महाराष्ट्रात हेच सुरू आहे, आज औरंगाबादबद्दल बोललं जातंय, उद्या पुणे, अहमदनगर, नाशिक वैगेरे अनेक शहरांची नावं बदलण्याची मागणी केली जाईल, त्यामुळे मागणी करण्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही.

लोकशाही पद्धतीत निवडून आलेले सत्ताधारी बहुमताच्या जोरावर शहरांची नावं बदलतात. याआधी मायावतींनी हे करून दाखवलेलं आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्यामुळे विकासाला आम्ही महत्त्व दिलं आहे. तीच भूमिका घेऊन सरकार पुढे चाललं आहे, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा- ‘संभाजीनगर’च्या परस्पर नामांतरावरून काँग्रेसमध्ये संताप

त्याआधी या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी तातडीने ३ ट्विट करत आपला संताप व्यक्त केला. 

महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (@MahaDGIPR) शहरांचं परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचं भान बाळगावं. शहरांचे नामांतरण करणं हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही. 

छत्रपती संभाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया, असे खडे बोल बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला (shiv sena) सुनावले.

(maharashtra deputy cm ajit pawar reacts on name change issue of aurangabad)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा