कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दोनदा पुढं ढकलण्यात आलेलं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ७-८ सप्टेंबर २०२० रोजी घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. कोरोना संसर्गाबाबतच्या अटी-शर्तीं पाळून केवळ दोनच दिवस हे अधिवेशन घेण्यात येणार आहे. (Maharashtra legislative assembly 2 day monsoon session will start from 7th September 2020)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार २५ आॅगस्ट २०२० रोजी विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली.या बैठकीत अधिवेशनाबाबतचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदामंत्री जयंत पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, संसदीय कामकाजमंत्री ॲड. अनिल परब, गृह राज्यमंत्री सतेज पाटील आदी उपस्थित होते.
हेही वाचा - पावसाळी अधिवेशन पुन्हा पुढे ढकललं, ‘या’ तारखेपासून घेण्याची शिफारस
या अधिवेशनात शोक प्रस्तावावर चर्चा, अतारांकित प्रश्न, पुरवणी मागण्या, विनियोजन विधेयक यावर चर्चा घेण्यात येतील. यामध्ये ७ शासकीय विधेयके आणि एक विनियोजन विधेयकाचा समावेश असेल, अशी माहिती विधानमंडळ सचिव ॲड. राजेंद्र भागवत यांनी यावेळी दिली.
अधिवेशनासाठी विधिमंडळ सदस्य, त्यांचे स्वीय सहाय्यक आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी नियमावली बनवण्यात आली आहे. या नियमावलीचं पालन सर्वांना करावं लागणार आहे.
अधिवेशनाच्या एक दिवस आधी म्हणजे ६ सप्टेंबर रोजी सर्व सदस्यांची कोविड-१९ साठीची ‘आरटीपीसीआर’ तपासणी करण्यात येईल. ज्या सदस्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह येईल, त्यांनाच सभागृहात प्रवेश दिला जाईल.
प्रत्येक सदस्याला मास्क, हँडग्लोव्ह्ज आणि सॅनिटायझरचा समावेश असलेलं सुरक्षा किट देण्यात येईल. सदस्यांच्या स्वीय सचिवांना सभागृहात प्रवेश मिळणार नाही. त्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. सदस्यांच्या वाहनचालकांची देखील बसण्याची तसंच नाश्ता, चहापाण्याची स्वतंत्र व्यवस्था असेल. इतर आजार असलेल्या सदस्यांना त्यांच्या पक्षाच्या गट नेत्यांकडून काळजी घेण्याची सूचना देण्यात येईल.
सभागृहासह प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीत देखील शारीरिक अंतराचं नियम पाळून माजी सदस्यांची आसन व्यवस्था करण्यात येईल.