Advertisement

महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन सुरूच राहणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा


महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन सुरूच राहणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
SHARES

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा दीड हजारांच्या पलिकडे जाऊन पोहोचल्याने महाराष्ट्रात १४ एप्रिलनंतरही लाॅकडाऊन सुरूच ठेवण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. हे लाॅकडाऊन पुढचे १६ दिवस म्हणजेच ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ काॅन्फरन्सिगच्या माध्यमातून झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. साेशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना ठाकरे यांनी ही माहिती दिली. 

मीच माहिती देतो

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, व्हिडिओ काॅन्फरन्सिच्या माध्यमातून पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी सर्वात पहिल्यांदा मला बोलण्याची संधी दिली. त्यावेळी १४ तारखेनंतरही महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू ठेवणार असल्याचं मी त्यांना सांगितलं. कोणत्याही उलटसुलट बातम्या तुमच्यापर्यंत येण्याआधी मीच तुम्हाला ही माहिती देण्याचं ठरवलं. आजपर्यंत जे धैर्य दाखवलंत तसंच यापुढेही दाखवा अशी अपेक्षाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

म्हणून वाढले कोराेनाग्रस्त

महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे हे खरं आहे. पुण्यातून त्याची सुरुवात झाली आणि मुंबईतही कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. यामागचं कारण म्हणजे मुंबई हे जगाचं प्रवेशद्वार आहे. इथं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. आपण तपासण्या सुरु केल्या तेव्हा फक्त केंद्राकडून आलेल्या यादीतल्या देशांनाच बंदी होती. मात्र जे देश यादीत नव्हते त्यातील अनेकजण लोकांमध्ये मिसळले आणि रुग्ण वाढले. मुंबईत ज्या ज्या ठिकाणी कोरोनाबाधित आढळले आहेत ते भाग सील करण्यात आले आहेत.

घरोघरी चाचण्या

आता समोरुन रुग्ण येण्याची वाट न बघता महापालिका घरोघरी जाऊन चाचण्या करत आहे. मुंबईत आतापर्यंत १९ हजार कोविड चाचण्या झाल्यात आहेत. यातील १ हजार कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. त्यातील बहुतेक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आढळून आल्याने हे दिलासादायक आहे. क्वारंटाईनमध्ये असणाऱ्यांची तपासणी करुन त्यांची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांनाही घरी सोडलं जात आहे. जे जण दगावलेत त्यातील बहुतेकजण ६० पेक्षा अधिक वय असणारे किंवा हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब इ. गंभीर आजार असणारे आहेत.

निर्बंध कठोर करावे लागतील

लाॅकडाऊन सुरूच राहणार असलं, तरी शेतीच्या कामावर कोणतीही बंधने नाहीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरुच राहील. १४ एप्रिलनंतर कुठेही मला गोंधळ नको. सोमवारी आपल्या राज्यात पहिला रुग्ण आढळून ५ आठवडे होतील. कोरोनाची साखळी तोडायला वेळ लागेल. त्यासाठी काही ठिकाणी निर्बंध कठोर करायलाच लागतील. हा लॉकडाऊन कधीपर्यंत चालेल हे जनतेच्या हातात आहे. 

शिस्त पाळा

व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये पंतप्रधानांसह सर्व मुख्यमंत्री तोंडावर मास्क लावून बसले होते. जशी खबरदारी आम्ही घेतोय, तशी प्रत्येकाने घ्या. घराबाहेर पडू नका, गर्दी करू नका, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर मास्क लावून पडा. घरातील ज्येष्ठ, मुलांना जपा, त्यांच्यापर्यंत हा व्हायरस पोहोचू देऊ नका, ही परिस्थिती नियंत्रणात आहे असं वाटत असलं तरी गाफील राहता कामा नये, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा