येत्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप येणार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत, असा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी किंवा १० जूनपूर्वीच संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील, असा खळबळजनक दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केला.
संजय राऊत यांनी राष्ट्रवादीत कळवलं होतं की, आता उद्धव ठाकरे यांचे काही खरे नाही. त्यांच्याकडे पक्ष राहिलेला नाही. ते मला पुन्हा खासदार करु शकत नाहीत. त्यामुळे आता मला उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्यात रस नाही. त्यामुळे मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घ्या, असा प्रस्वात संजय राऊत यांनी मांडल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
ज्यादिवशी शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला, त्या दिवशीही संजय राऊत यांना त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसायचे होते. त्यासाठी संजय राऊत सकाळपासून शरद पवार यांना फोन करत होते. पण शरद पवार यांनी त्यांचा फोन उचलला नाही. त्यामुळे संजय राऊत सिल्व्हर ओकवर गेले होते, असे नितेश राणे यांनी सांगितले.
संजय राऊत ठाकरेंना एकटं पाडण्याचा प्रयत्न करत आहेत का? संजय राऊत चार-चार वेळा पवारांना भेटतात मग उद्धव ठाकरे यांना एकदाही शरद पवारांची भेट का मिळाली नाही, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.