महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर मनसेनं नवी जबाबदारी सोपवली आहे. रविवारी झालेल्या मराठी भाषा गौरव दिनाचा मुहुर्तावर मनसेने अमित ठाकरे यांची निवड महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी केली आहे.
आगामी मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून मनसेमध्ये सक्रीय आहेत. मनसेच्या मुंबईतील राजगड या मध्यवर्ती कार्यालयाने एक पत्रक प्रसिद्ध करून या संदर्भातील घोषणा केली आहे.
मराठी भाषा गौरव दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित राज ठाकरे यांची नियुक्ती जाहीर करण्यात येत आहे, असे या पत्रकात म्हटले आहे. या निवडीमुळं पुढच्या काळात अमित ठाकरे हे मनसेमध्ये अधिक सक्रिय झालेले दिसू शकतात.
राज ठाकरे यांचे सुपुत्र हे गेल्या काही वर्षांपासून मनसेमध्ये बऱ्यापैकी सक्रिय होते. मात्र त्यांच्याकडे पक्षानं कुठलंही पद किंवा जबाबदारी सोपवली नव्हती. ते मनसेच्या विविध कार्यक्रमांमध्ये तसंच दौऱ्यावर जात होते. मात्र आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानं अमित ठाकरेंवरील जबाबदारी वाढणार आहे.