ऐन गणेशोत्सवाच्या काळात मुंबई पश्चिम उपनगरात एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. साकीनाका परिसरात घडलेल्या अत्यंत अमानूष अशा प्रकारानं समाजमन हादरुन गेलं आहे. या प्रकरणी सर्वसामान्य जनतेकडून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे. अशातच आता मनसेच्या नेत्या रुपाली पाटील- ठोंबरे यांनी फेसबुकद्वारे राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारला बलात्कार करणाऱ्यावर कारवाई करता येत नसेल, तर त्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा चौरंगा करु, असं म्हणत इथं न्याय होणारच, असं रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्यानं घडत असताना पश्चिम उपनगरात साकीनाका परिसरात घडलेल्या अत्यंत अमानूष अशा प्रकारानं समाजमन हादरुन गेलं आहे. एका विकृत परप्रांतीयाने ३२ वर्षाच्या महिलेवर पाशवी बलात्कार करीत निर्दयपणे मारहाण करून तिची हत्या केली.
गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्यानं जबर जखमी झालेल्या महिलेची मृत्यूशी सुरू असलेली झुंज सुमारे ३३ तासांनंतर अपयशी ठरली. राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. माणुसकीला काळिमा फासणारे हे दुष्कृत्य करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. मोहन चौहान, असे या क्रूरकर्म्याचे नाव असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील जौनपूरचा आहे. त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.