Advertisement

राज ठाकरे यांच्या मुंबईतील सभेला अखेर मंजुरी

अखेर निवडणूक आयोग आणि महापालिकेनं राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली असून, २४ एप्रिलएेवजी एक दिवस आधी म्हणजे २३ एप्रिलला राज ठाकरे यांची काळाचौकी येथे सभा होणार आहे.

राज ठाकरे यांच्या मुंबईतील सभेला अखेर मंजुरी
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढवत नसली तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा सुरू आहेत. राज ठाकरे यांनी निवडणुकीत मोदी आणि शाह यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. नांदेड, सोलापूर, इचकरंजी, सातारा, पुणे, महाडनंतर आता राज यांची सभा मुंबईत होणार आहे. मुंबईत २४ एप्रिल रोजी होणाऱ्या त्यांच्या सभेला परवानगी मिळत नव्हती. परंतु, अखेर निवडणूक आयोग आणि महापालिकेनं राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली असून, २४ एप्रिलऐवजी एक दिवस आधी म्हणजे २३ एप्रिलला राज ठाकरे यांची काळाचौकी इथं सभा होणार आहे. 


२३ एप्रिल रोजी सभा

राज ठाकरे यांच्या काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानात होणाऱ्या सभेसाठी मनसेने महापालिका आणि निवडणूक आयोगाकडं परवानगी मागितली होती. मात्र, पालिकेनं या सभेची परवानगी नाकारली होती. परंतु त्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटताच राज यांच्या सभेला परवानगी देण्यात आली असून, २३ एप्रिल रोजी काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानात ही सभा पार पडणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या काळात सभेच्या परवानगीसाठी असलेली ‘एक खिडकी योजना’ आणि पालिकेकडून परवानगीसाठी टोलवाटोलवी केली जात असल्याचा आरोप मनसेकडून यापूर्वी करण्यात आला होता.


नियमाप्रमाणं परवानगी 

निवडणूक विषयक सर्व प्रकारच्या सभा, प्रचारसभांसाठीच्या रितसर परवानग्या जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘एक खिडकी योजने’अंतर्गत दिल्या जातात. त्यामध्ये सर्वच पक्ष, अपक्षांचा समावेश असतो. नियमानुसार या परवानग्या दिल्या जातात. त्यात कोठेही पक्षपातीपणा केला जात नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं देखील सभेची परवानगी मागितली होती. त्यांनाही नियमाप्रमाणं परवानगी देण्यात आली आहे. तसंच, अन्य पक्षांचेही अर्ज आले असून, त्यांचाही नियमानुसार विचार केला जात आहे. याबाबत होत असलेल्या अपप्रचाराबाबत खुलासा करण्यात येत आहे, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.


‘लाव रे तो व्हिडिओ'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभेमध्ये व्हिडिओ दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या आश्वासनांची जनतेसमोर पोलखोल करत आहेत. त्यामुळं मुंबईत होणाऱ्या सभेमध्ये राज ठाकरे ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत कोणता व्हिडिओ दाखवणार याकडं सर्वांचंच लक्ष लागलं आहे.



हेही वाचा -

'राज ठाकरेंच्या सभा म्हणजे निव्वळ टाईमपास'- विनोद तावडे



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा