२.०० - बंद काल होता आज कारवाई कशाला, पोलिसांनी हाच फौजफाटा काल बंदच्या वेळेस का वापरला नाही? - विद्या चव्हाण
१.५० पोलिसांची दादागिरी चालू देणार नाही, आरोपी मोकाट फिरताहेत आणि निर्दोषांना अटक होतेय - विद्या चव्हाण
१.४५ - भीमा कोरेगावरच्या आरोपींना अद्याप अटक नाही आणि गुन्हेगारांवर कारवाई कशाला? हे खपवून घेणार नाही - विद्या चव्हाण
१.४०- राष्ट्रवादीच्या आ. विद्या चव्हाण घटनास्थळी उपस्थित
१.२० - जिग्नेश मेवानी आणि उमर खालिद यांच्याविरोधात जुहू पोलिसांकडून सर्च वॉरंट जारी
१.१५ - छात्र भारतीचे अध्यक्ष दत्ता ढगे यांना पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झाल्याची माहिती
१.०४ - जुहू पोलिस ठाण्यासमोर छात्र भारतीच्या विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन
छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित केलेल्या राष्ट्रीय छात्र संमेलनाला दलित नेते आ. जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद उपस्थित राहणार आहेत. पण छात्र भारतीचा हा कार्यक्रम ज्या ठिकाणी होणार होता. त्या ठिकाणाला छावणीचे स्वरुप प्राप्त झाल्याने पोलिसांनी सभेला नकार दिला. मात्र आपण रस्त्यावर का होईना कार्यक्रम घेऊ, अशी प्रतिक्रिया देत छात्र भारतीने हा कार्यक्रम होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान छात्र भारतीच्या विद्यार्थ्यांची पोलिसांकडून धरपकड सरू झाली आहे. तर छात्र भारतीचे अध्यक्ष दत्त ढगे यांना अटक करण्यात आली आहे.
शिक्षक भारती संघटनेचे आ. कपिल पाटील आणि छात्र भारती अध्यक्ष कार्यक्रमाचे आयोजक सचिन बनसोडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. भिमा कोरगाव हिंसाचाराचं कारण देत कलम १४९ अंतर्गत नोटीस बजावून कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली. दरम्यान पुण्यामध्ये भीमा कोरेगाव महोत्सवाच्या व्यासपीठावर चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार कपिल पाटील, अजित शिंदे, दत्ता ढगे, सागर भालेराव, सचिन बनसोडे यांच्यासह २५० हून अधिक जणांना जुहू पोलीस ठाण्यात आणलं. दरम्यान छात्र भारतीचे अध्यक्ष दत्ता ढगे यांना पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. तर जिग्नेश मेवानी आणि उमर खालिद यांच्याविरोधात जुहू पोलिसांकडून सर्च वॉरंट जारी करण्यात आलं असून प्रदीप नरवाल आणि अलाहाबाद विद्यापीठाच्या अध्यक्षा सिंग यांना अटक करण्यात आली आहे.
राज्यभरातून विविध कॉलेजमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी होणार आहेत. जिग्नेश मेवाणी, उमर खालीद यांच्यासह रिचा सिंग, प्रदीप नरवाल या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दिवसभर चालणाऱ्या या संमेलनात शिक्षण व्यवस्था, विद्यार्थी चळवळ आणि विद्यार्थ्यांच्या कळीच्या प्रश्नांवर विचारमंथन होणार आहे. भीमा कोरेगाव आणि महाराष्ट्र बंद नंतर हे दोन तरुण नेतृत्त्व काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं.