मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयानं हा जामीन मजूर केला आहे.
4 मे दिवशी मनसेच्या भोंगा आंदोलनादरम्यान शिवाजी पार्क परिसरात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande), नेते संतोष धुरी (Santosh Dhuri) पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेले होते, असा आरोप करण्यात आला होता. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला किरकोळ दुखापतही झाली होती.
गाडीतून पसार झालेल्या संदीप देशपांडेवर यामुळे कारवाई केली जावी, अशी मागणी केली जात होती. त्यानंतर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी यांच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आलेला होता. तेव्हापासून अज्ञातवासात असलेल्या या दोघांनाही आज दिलासा मिळाला आहे.
मुंबई सत्र न्यायालयाने संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यांच्यासोबतच मनसेचे संतोष साळी आणि संदीप देशपांडे यांचे चालक रोहित वैश्य यांनाही जामीन मंजूर केला आहे.
राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आमच्या संयमाचा अंत पाहू नका. सत्ता येते जाते, असा स्पष्ट इशारा दिला होता. याच पत्रामध्ये त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांविरूद्ध होणारी पोलिसांची दडपशाहीची वागणूक यावरही टीका केली होती. आज अखेर मनसेच्या नेत्यांना 15 दिवसांनंतर दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ तारखेला होणारी सभा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही सभा २२मे रोजी होणार असल्याची माहिती मिळत आहे. या सभेनंतर ५ जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा आहे.
हेही वाचा