23 जूून 2017 हा दिवस कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी मह्त्त्वाचा ठरवण्याची तयारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांनी कळत नकळत करून ठेवली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि नारायण राणे हे कट्टर राजकीय वैरी एकाच व्यासपिठावर उपस्थित राहणार आहेत. 'मुुुंबई लाइव्ह'ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमानंतर भूमिपूजन कार्यक्रमाचे उद्घाटनकर्ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रमुख पाहुणे केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी हे नारायण राणे यांच्या 'ओम गणेश' या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी जाण्याची शक्यता आहे. राणे यांनी फडणवीस आणि गडकरी यांना भोजनासाठी आमंत्रित केले आहे. विशेष म्हणजे 23 जून हा नारायण राणे यांचे आमदारपुत्र नितेश यांचा वाढदिवस आहे. थोडक्यात, नितेश राणे यांच्या वाढदिवसासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय दळणवळणमंत्री हे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित आहेत.
हेही वाचा-
उद्धव आणि राणे एकत्र येण्याचा `योग` २३ जूनला ?
नारायण राणे यांच्या भाजपाप्रवेशाचा मुहूर्त ठरला
उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातले टोकाचे राजकीय शत्रुत्व लक्षात घेता दोघांपैकी एकजण किंवा दोघेही कार्यक्रमाकडे पाठ फिरवतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र दोघांनीही एकमेकांचा 'सामना' करायचा निर्णय घेतला आहे. लंडनवारीहून मुंबईत दाखल झालेले नारायण राणे कोकण मुक्कामी पोहोचले आहेत. तर उद्धव ठाकरेसुद्धा गुरुवारी संध्याकाळी गोव्यात दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. कार्यक्रमाला दोघांच्या एकत्रित उपस्थितीच्या बातमीची खातरजमा होत असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी हे भाजपा नेते नारायण राणे यांच्या घरचा पाहुणचार घेण्याची शक्यता असल्याची माहिती 'मुंबई लाइव्ह'ला मिळाली आहे.
भाजपा नेत्यांशी 'लंच डिप्लोमसी'च्या निमित्ताने नारायण राणे यांच्या भाजपाप्रवेशाच्या चर्चेला पुन्हा उधाण येणार, हे निश्चित. नितीन गडकरी यांच्याशी नारायण राणे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. या मैत्रीखातर गडकरी हे राणेंचा पाहुणचार घेणार. तर राजकीय मतभेद विसरून सौजन्य म्हणून स्नेहभोजनाला उपस्थित राहिल्याचं फडणवीस सांगतील. गडकरीच्या मैत्री आणि फडणवीसांच्या सौजन्याआडून शिवसेनेच्या वाघाच्या मिशा ओढण्याची संधी भाजपाला मिळणार आहे. तीसुद्धा कोकणातल्या सागोती-वडे आणि हलवा, बांगडा, सुरमईच्या साक्षीने.