‘सूर्याकडे पाहून थुंकलं की थुंकी आपल्याच अंगावर पडते हे विसरु नका. आपली योग्यता काय, आपण बोलतो काय? आपण कुणाबद्दल बोलतोय, याचं तरी भान ठेवा’, अशा खरमरीत शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांना (ncp leader and deputy cm ajit pawar slams bjp mlc gopichand padalkar over comment on sharad pawar) सुनावलं. साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी निवडीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी शरद पवार, अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील शनिवारी उपस्थित होते. त्यावेळी अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सर्वसामान्यांसाठी कार्यरत
गोपीचंद पडळकर यांचा समाचार घेताना अजित पवार म्हणाले, शरद पवार यांना संपूर्ण देश ओळखतो. कोणतंही संकट असो मग ती गारपीट असो किंवा दुष्काळ, भूकंप किंवा इतर काही समस्या, ते कधीही स्वस्थ बसत नाहीत. संकटग्रस्तांना मदत करण्यासाठी ते सतत कार्यरत असतात. शरद पवार आपल्या उमेदीच्या काळात तर फिरलेच पण या वयातही ते सर्वसामान्यांच्या सतत भेटीगाठी घेत असतात, त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच शरद पवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केलेला आहे. एवढंच नाही, तर शरद पवार यांचा शब्द तेही नेहमी मानतात, असं अजित पवार यांनी सांगितलं.
हेही वाचा - ताेंड सांभाळून बोला! आव्हाडांचा पडळकरांना इशारा
त्यांचा स्वभावच तसा
जी व्यक्ती शरद पवार यांच्याविषयी भान न ठेवता बोलली त्या व्यक्तीचा मूळ स्वभाव तसाच आहे. याआधी त्या व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीही अशीच वक्तव्ये केली होती. एखाद्याला नको तितकं महत्त्व दिल्याने त्याला आकाशही ठेंगणं वाटतं त्यातलाच हा प्रकार आहे. बारामतीकरांनी त्याचं डिपॉझिट जप्त करून त्याला किती जनाधार आहे हे दाखवून दिलेलं आहे. तेव्हा आम्ही असल्या माणसांकडे लक्ष देत नसतो, अशा शब्दांत अजित पवार यांनी गोपीचंद पडळकरांवर टीका केली.
काय म्हणाले पडळकर?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत. शरद पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण करत आहेत. पण या काळात त्यांनी बहुजन समाजाला झुलवत ठेवून केवळ राजकारण केलं. बहुजन समाजाला कधीही पुढं येऊ दिलं नाही. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. त्यामुळे पवार हे धनगर आरक्षणावर पॉझिटिव्ह असतील असं वाटत नाही. खरं तर पवार यांची कुठलीही विचारधारा नाही, अजेंडा नाही आणि व्हिजनही नाही. , अशी टीका पडळकरांनी शरद पवारांवर केली होती.
हेही वाचा - शरद पवार महाराष्ट्राला लागलेले कोरोना, गोपीचंद पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य