विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दुपारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची परळच्या केईएम रुग्णालयात भेट घेतली. महाराष्ट्र सदन आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात भुजबळ यांना शुक्रवारी जामीन मंजूर झाला. त्यानंतर धनंजय मुंडे त्यांना भेटण्यासाठी केईएम रुग्णालयात गेले. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप कळलं नसलं, तरी रुग्णालयातून बाहेर आल्यावर भुजबळ सोमवारपासून पुन्हा राजकारणात सक्रीय होतील, असं कळत आहे.
छगन भुजबळ गेल्या अनेक दिवसांपासून आजारी आहेत. त्यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर केईएम रुग्णालयातील गॅस्ट्रोलॉजी विभागात उपचार सुरू आहेत. स्वादुपिंडाच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी केईएम रुग्णालय प्रशासन केवळ त्यांच्या जामिनाची वाट बघत होते. आता भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्याने शस्त्रक्रियेचा निर्णय तेच घेणार आहेत.
धनंजय मुंडे आणि भुजबळ यांच्यात साधारणत: अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेत नेमकं काय बोलणं झालं हे मात्र कळू शकलेलं नाही. मात्र मुंडे बाहेर आल्यानंतर त्यांनी भुजबळ सोमवारपासून पुन्हा राजकारणात सक्रीय होतील, अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली.
भुजबळ आणखी दोन दिवस रूग्णालयातच राहण्याची शक्यता आहे. डॉक्टरांशी डीस्चार्ज संबंधी चर्चा केल्यावर सोमवारपासून ते पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये सक्रीय होतील, असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला. शिवाय न्याय देवतेने न्याय दिल्याबद्दल समाधान आणि आनंद व्यक्त केला, अशी प्रतिक्रियाही दिली. भुजबळ पुन्हा सक्रीय झाल्यास ओबीसी फ्रंडला पुन्हा नवं बळ प्राप्त होणार आहे.
हेही वाचा-
तब्बल दोन वर्षांनंतर छगन भुजबळ यांना जामीन मंजूर